मुंबई, (प्रतिनिधी) १४ मार्च - पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे आयटी कंपन्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर येथे आयटी पार्क उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे. महसूल विभागाची प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून प्रकल्पाची कार्यवाही जलदगतीने केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाढती वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे काही मोठ्या आयटी कंपन्या स्थलांतर होत असल्याची बाब विधानसभेत मांडण्यात आली. कंपन्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत आणि चांबळी परिसरातील गायरान जमीन आयटी पार्कसाठी हस्तांतरित करण्याबाबत शासनाची भूमिका काय, अशी लक्षवेधी सूचना सदस्य विजय शिवतारे यांनी विधानसभेत मांडली.
यावेळी झालेल्या चर्चेत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनीही सहभाग घेऊन सांगितले की, पुण्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता पुरंदर हा आयटी पार्कसाठी योग्य पर्याय आहे. २०२५ मध्ये उद्योग विभागाच्या बैठकीत याबाबत प्राथमिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रस्ताव प्राप्त झाला असून २७ फेब्रुवारी २०२६ रोजी उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी महसूल विभागाकडे ५७२ हेक्टर महसुली जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे. ही जमीन शासनाची महसुली जमीन असल्याने ती उपलब्ध झाल्यास प्रकल्पासाठीचा खर्चही कमी होईल. यासाठी महसूल विभागाने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडणे आवश्यक असून मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, असेही राज्यमंत्री नाईक यांनी सांगितले.