नाशिक, (विशेष प्रतिनिधी) १४ मार्च - युद्धजन्य परिस्थिती, महागाई आणि निर्यातीतील अडथळ्यांच्या विळख्यात अडकलेला भारतीय कांदा आता पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठेत आपली पकड मजबूत करत आहे. आखाती देशांमध्ये, विशेषतः दुबईत भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रातील नाशिकच्या कांद्याची मोठी मागणी वाढली असून, आगामी १० ते १५ दिवसांत निर्यातीला अधिक वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुबईतील दरात चढ-उतार
काही दिवसांपूर्वी दुबईत कांद्याचे दर गगनाला भिडले होते. युद्धापूर्वी ०.८० दिरहंम प्रति किलो मिळणारा कांदा २ मार्च रोजी चक्क ५ ते ७ दिरहंमपर्यंत पोहोचला होता. मात्र, आता हे दर स्थिर होत असून सध्या ३ दिरहंम (भारतीय चलनात साधारण ७५ रुपये) प्रति किलोवर आले आहेत. खोर फकान, जुमेरा आणि ओमानमधील सोहार ही बंदरे पुन्हा कार्यान्वित झाल्याने व्यापारातील अडथळे दूर होत आहेत.
वाहतूक खर्चाचा मोठा फटका
सौदी आणि आसपासच्या प्रदेशातील युद्धामुळे जलमार्ग वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी ८० पैसे ते १ रुपया प्रति किलो असलेला वाहतूक खर्च आता २० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे निर्यातदारांना एका टनामागे २०० डॉलरऐवजी ३५० डॉलर मोजावे लागत आहेत. असे असूनही, मलेशिया (२०० डॉलर), सिंगापूर (२४०-२५० डॉलर) आणि श्रीलंका (२५०-२७० डॉलर) यांसारख्या देशांमध्ये भारतीय कांद्याची निर्यात सुरूच आहे.
बांगलादेशविना निर्यात वाढल्याने 'दिल्ली' खूष
विशेष म्हणजे, भारताचा मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने सध्या भारतीय कांद्यावर निर्बंध लादले आहेत. असे असतानाही चालू वर्षी जानेवारीअखेर १२ लाख टनांहून अधिक निर्यात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा मोठा असल्याने दिल्लीतील प्रशासकीय वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे. बांगलादेशात सत्तांतर झाल्याने जूननंतर पुन्हा तिथली बाजारपेठ खुली होईल, असा विश्वास निर्यातदारांना वाटत आहे.
उन्हाळ कांदा ठरणार भाववाढीचा 'किंग'
नाशिक जिल्ह्यात सध्या लेट खरीप (लाल) कांद्याची आवक अंतिम टप्प्यात आहे. कडक उन्हामुळे लाल कांद्याची साल निघण्याची समस्या जाणवत असल्याने व्यापारी आता साठवणुकीच्या उन्हाळ कांद्याकडे वळले आहेत.
साठवणुकीवर भर: उन्हाळ कांदा जास्त काळ टिकत असल्याने शेतकरी तो लगेच विकण्याची घाई करत नाहीत.
राज्यांतर्गत मागणी: कर्नाटक आणि गुजरातचा कांदा संपत आल्याने उत्तर आणि ईशान्य भारतात महाराष्ट्राच्या कांद्याला मोठी मागणी राहणार आहे.
भाववाढीचे संकेत: येत्या ८ ते १० दिवसांत उन्हाळ कांद्याच्या भावात हळूहळू वाढ होण्याचे संकेत बाजार विश्लेषकांनी दिले आहेत.
"युद्धजन्य परिस्थितीचे ढग विरळ झाले की आखाती देशांतील मागणी आणखी वाढेल. वाहतूक खर्च वाढलेला असला तरी नाशिकच्या कांद्याला पर्याय नसल्याने निर्यातीचा आलेख उंचावलेलाच राहील."
— निर्यातदार प्रतिनिधी