अश्विनी भाटवडेकर, मुंबई, १२ मार्च - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील पाटणे गावातील धनश्री अहिरे यांनी देखील घवघवीत यश संपादन केले आहे. धनश्री अहिरे यांनी पाचव्या प्रयत्नात संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा पास करत आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. देशातून ४८९ वा रँक मिळवत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या.
धनश्री जिभाऊ अहिरे यांचे प्राथमिक शिक्षण पाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत तर अकरावी - बारावीचे शिक्षण सटाणा येथील महाविद्यालयात झाले. त्यानंतर धनश्री यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला दोन वर्ष पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. २०२१ मध्ये पहिली परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी तीन परीक्षा दिल्या. या तीनही परीक्षेत त्या मुलाखतीपर्यंत पोहोचल्या. २०२५ मध्ये त्यांनी पाचव्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यांची मुलाखत देखील झाली आणि अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला, आणि यात धनश्री यांचा देशातून ४८९ रँक आल्याचे जाहीर झाले. गेल्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या पदासाठी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल चार महिन्यापूर्वी लागला. त्यात त्यांची सहाय्यक वनसंरक्षण या पदासाठी निवड झाली होती.
धनश्री यांच्या घरात कोणीही उच्चशिक्षित नाही. आई वडील शेती करतात. धनश्री यांनी बारावीपासूनच आयपीएस होण्याचे स्वप्न बाळगले होते. आयपीएस अधिकारी भरत आंधळे आणि विश्वास नागरे पाटील यांची पुस्तके लहानपणापासून वाचले तसेच व्हिडीओ बघितले. बारावीनंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असली आणि स्वतःवर विश्वास असेल तर आपण कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो, असं धनश्रीने सांगितलं.