नाशिक जिल्ह्यातील हे गाव होणार मधाचे... विकासाला मिळणार अशी चालना...

Share:
Main Image
Last updated: 09-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ मार्च - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मधाचे गाव’ या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले. अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  वैशाली भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे चाकोरे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, मध संचालनालयाचे संचालक रघुनाथ नारायणकर, सरपंच यमुना पोटे, स्वदेश फाउंडेशनचे तुषार इनामदार, रमेश सुरंग-पाटील, मध निरीक्षक वसंत चौधरी, योगेश पवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील चाकोरे गावाचा ‘मधाचे गाव’ म्हणून विकास करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत चाकोरे व बेळे गट ग्रामपंचायतीतील ४० मधपाळांची निवड करण्यात आली असून त्यापैकी २५ मधपाळांना १० दिवसांचे मधमाशीपालन प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

यावेळी सभापती साठे यांच्या हस्ते १२५ मधपेट्यांचे व आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच मधमाशी पालनासंदर्भातील माहिती दालनाचे उद्घाटनही करण्यात आले. ‘मधाचे गाव’ योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच मध पर्यटनालाही प्रोत्साहन मिळेल, असे साठे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक ‘मधाचे गाव’ विकसित करण्याची संकल्पना असून पहिल्या टप्प्यात राज्यातील १० गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी शासनाने ५.१० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून प्रत्येक गावाला सुमारे ५० ते ५५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये मौजे घोलवड–पालघर, मौजे भंडारवाडी–नांदेड, मौजे बोरझर–नंदुरबार, मौजे काकडदभा–हिंगोली, मौजे चाकोरे–नाशिक, मौजे उडदावणे–अहिल्यानगर, मौजे शेलमोहो–परभणी, सिंधी विहीर–वर्धा, सालोशी–सातारा आणि आझमरी–अमरावती या गावांचा समावेश आहे. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.