पाच वर्षांचा 'वनवास' संपला... बहिष्कृत मनीषा सन्मानपूर्वक माहेरी...

Share:
Main Image
Last updated: 28-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ फेब्रुवारी - आंतरजातीय विवाह केल्यामुळे आपल्या हक्काच्या माहेरापासून पाच वर्षे दूर राहिलेल्या मनीषाला अखेर न्याय मिळाला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, गुरुवारी मनीषाने आपल्या भावाच्या लग्नात सन्मानपूर्वक उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, या प्रकरणामुळे केवळ मनीषाचाच बहिष्कार उठला नाही, तर तिच्या समाजातील जाचक 'जातपंचायत' देखील बरखास्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंचांनी घेतला आहे.

नेमके प्रकरण काय?
मनीषा ही भटके विमुक्त प्रवर्गातील चित्रकथी समाजातील आहे. तिच्या अंगावर सफेद डाग (कोड) असल्याने 'अशी स्त्री देवाला चालत नाही' या अंधश्रद्धेपायी समाजातील तरुण तिच्याशी लग्नास तयार नव्हते. अखेर तिने नवबौद्ध समाजातील चेतन याच्याशी प्रेमविवाह केला. मात्र, आंतरजातीय विवाहास बंदी असलेल्या चित्रकथी जातपंचायतीने मनीषासह तिच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. कुटुंबाने ५१ हजार रुपये दंड भरून समाजात प्रवेश मिळवला, पण मनीषावरील बहिष्कार कायम होता. यामुळे पाच वर्षांपासून ती आई-वडिलांना भेटू शकली नव्हती.

अंनिस आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची मध्यस्थी
आपल्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहता यावे, यासाठी मनीषाने 'जातपंचायत मूठमाती अभियानाचे' राज्य कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांच्याकडे धाव घेतली. चांदगुडे यांनी ही बाब डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिली. डॉ. गोऱ्हे यांनी तत्काळ नाशिक दौऱ्यात पोलीस महानिरीक्षकांसोबत बैठक घेऊन नंदुरबार पोलीस अधीक्षकांना मनीषाला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.

कायद्याचा धाक आणि सुसंवादाचा मार्ग
अक्कलकुआ पोलीस ठाण्यात पंचांना बोलावून समज देण्यात आली. एका बाजूला कायद्याचा धाक आणि दुसऱ्या बाजूला अंनिसने साधलेला सुसंवाद यामुळे पंचांचे हृदयपरिवर्तन झाले. पंचांनी केवळ मनीषाला लग्नाचे निमंत्रण दिले नाही, तर नाशिक येथे झालेल्या बैठकीत आपली 'जातपंचायत' बरखास्त करत असल्याचे जाहीर केले. तसेच, भविष्यात आंतरजातीय विवाहांना परवानगी देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला.

पाच वर्षांनंतर माहेरची ओढ पूर्ण
गुरुवारी पार पडलेल्या भावाच्या लग्नात मनीषा पाच वर्षांनंतर आपल्या आई-वडील, भाऊ आणि नातेवाईकांना भेटली. समाजाने तिचा सन्मानपूर्वक स्वीकार केल्याने तिचे डोळे पाणावले होते. एका अनिष्ट प्रथेचा अंत झाल्याने सामाजिक स्तरावर या निर्णयाचे स्वागत होत आहे.

"माझ्या लढ्याला यश आले आहे. लाडक्या भावाच्या लग्नात हजर राहिल्याचा मोठा आनंद आहे. सर्व नातेवाईक माझ्याशी खूप चांगले बोलले. येणाऱ्या काळात समाजातील अशा कुप्रथांविरोधात मी नक्कीच लढणार आहे."
— मनीषा (पीडित महिला)

Advertisement

Comments

No comments yet.