नाशिक, (प्रतिनिधी) २६ फेब्रुवारी - सीमेवरील जवानाचे शौर्य आणि संघर्षाचा चित्तथरारक प्रवास मांडणारी तसेच मुक्त पत्रकार, लेखक आणि साप्ताहिक सुपरफास्ट नाशिकचे संपादक भावेश ब्राह्मणकर यांच्या ‘अरूणोदय’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या मानाच्या अभ्यासवृत्तीतून साकारलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संरक्षण क्षेत्रातील दिग्गजांच्या हस्ते होणार आहे. कुसुमाग्रजांची जयंती आणि मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि लष्करी गुप्तहेर क्षेत्राचे तज्ज्ञ कर्नल विनायक भट तसेच सेवानिवृत्त नौदल उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे यांच्या शुभहस्ते या कादंबरीचे प्रकाशन होईल. कर्नल भट हे चिनी भाषा तज्ज्ञ असून भारत-चीन यांच्यातील वाटाघाटींमध्ये ते दुभाषी म्हणून भूमिका बजावतात. तसेच, उपग्रहाद्वारे घेतल्या जाणाऱ्या छायाचित्रांचे विश्लेषण करणाऱ्या अत्यंत मोजक्या व्यक्ती आशिया खंडात आहेत. त्यापैकीच ते एक आहेत. भारत, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या सॅटेलाईट छायाचित्रांचे विश्लेषण करून कर्नल भट यांनी आजवर भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवरील अनेक खळबळजनक बाबी उजेडात आणल्या आहेत. लष्करात असताना कर्नल भट यांनी तवांग परिसरात सेवा बजावली आहे. ते प्रथमच नाशिकला येत आहेत. तर, व्हाईस अडमिरल सुनील भोकरे हे भारतीय नौदलाच्या अण्विक कमांडचे प्रमुख राहिले आहेत. नौदलात त्यांनी विविध प्रकारचे नेतृत्व केले आहे. अंदमानच्या सुमद्रात अनेक देशांसोबत झालेल्या सरावाचेही नेतृत्व त्यांच्याकडे होते. सध्या ते मद्रास आयआयटीमध्ये तज्ज्ञ व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. तसेच, भारत सरकारच्या अनेक सुरक्षा समित्यांमध्ये ते सक्रीय आहेत.
'अरूणोदय' ही कादंबरी अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या अरूण नावाच्या सैनिकाच्या जीवनावर आधारित आहे. सीमेवरील आव्हाने आणि एका सैनिकाचा रोमहर्षक जीवनपट अत्यंत प्रभावीपणे या पुस्तकातून उलगडण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानने २०२४ मध्ये दिलेल्या एक लक्ष रुपयांच्या अभ्यासवृत्ती अंतर्गत या कादंबरीचे लेखन पूर्ण झाले आहे.
या प्रकाशन सोहळ्याला साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुरेश भटेवरा, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व कवी प्रकाश होळकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठान अभ्यासवृत्तीचे प्रमुख प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर, दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे, शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त प्रमोद भार्गवे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सल्लागार व ज्येष्ठ लेखक लोकेश शेवडे, ज्येष्ठ लेखिका डॉ. वृन्दा भार्गवे आदी मान्यवरांचा समावेश आहे.
साहित्यश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून त्यांच्याच नावाने असलेल्या प्रतिष्ठानच्या सहकार्याने ही साहित्यकृती रसिकांसमोर येत असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सोहळ्याला नाशिकमधील साहित्यप्रेमी, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
----
अधिक माहितीसाठी
भावेश ब्राह्मणकर
९४२३४७९३४८