मालेगावात नाट्यमय घडामोडी... संजय राऊत आणि दादा भुसे कोर्टात एकत्र... पुढं हे सगळं घडलं...

Share:
Main Image
Last updated: 21-Feb-2026

मालेगाव, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - गिरणा साखर कारखान्यात १७८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खा. संजय राऊत यांनी राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यावर केला होता. मात्र, आज (दि. २१ फेब्रुवारी) या प्रकरणात मोठी नाट्यमय घडामोड घडली. संजय राऊत यांनी हा आरोप चुकीच्या माहितीच्या आधारावर केल्याचे मान्य करत शेतकरी आणि जनतेची माफी मागितली आहे. यानंतर मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला बदनामीचा फौजदारी खटला मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने या वादावर अखेर पडदा पडला आहे.

काय होते प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी ‘सामना’ वृत्तपत्रातून आणि संजय राऊत यांच्या विधानांतून दादा भुसे यांनी गिरणा कारखान्यात १७८ कोटींचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे मालेगावच्या जनतेत आणि शेतकरी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आपली प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत दादा भुसे यांनी मालेगाव न्यायालयात संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता.

न्यायालयात दिलगिरी आणि खटला मागे
आज या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. यावेळी दोन्ही नेते एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले की, "संजय राऊत यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर माझ्यावर आरोप केले होते. यामुळे जनतेमध्ये संभ्रम होता. मात्र, आता राऊत साहेबांनी शेतकरी आणि जनतेची माफी मागितली आहे. आम्ही पूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले आहे. दादा भुसे काय करू शकतो आणि काय नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे."

आरोग्याचाही केला विचार
संजय राऊत यांची प्रकृती आणि त्यांचे वय लक्षात घेता, तसेच त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे हा खटला मागे घेण्याचा मोठेपणा मंत्री दादा भुसे यांनी दाखवला. "राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र ते पुराव्याशिवाय नसावेत," असा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.

Advertisement

Comments

No comments yet.