मला हे पूर्णपणे कधीच एन्जॉय करता आले नाही.... माजी कर्णधार मिथाली राजची स्पष्ट कबुली...

Share:
Main Image
Last updated: 18-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - ३६ पेक्षा अधिक संघ, ५५० हून अधिक खेळाडू आणि महिलांचे स्वतंत्र ८ संघ इतक्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभागात एसएमबीटी क्रिकेट कार्निव्हल २०२६ ची दिमाखदार सुरुवात झाली. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार व दिग्गज क्रिकेटपटू मिथाली राज यांच्या उपस्थितीत एसएमबीटी क्रिकेट कार्निव्हलचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील हे अतिशय उत्कृष्ट असे मैदान असल्याचे त्या म्हणाल्या. एसएमबीटीमधील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साह पाहून मला पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास क्रिकेटच्या मैदानात येण्याचा आनंद झाल्याचे सांगत क्रिकेट हा केवळ खेळ नसून व्यक्तिमत्व घडवणारा प्रवास असल्याचे मिथाली राज म्हणाल्या. याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

मिथाली राज याप्रसंगी म्हणाल्या की, मला माझं कॉलेज लाईफ पूर्णपणे एन्जॉय करता आले नाही, कारण त्या काळात मी क्रिकेटमुळे सतत प्रवास आणि सरावात व्यस्त होते. पण इथल्या विद्यार्थ्यांना एकत्र खेळताना पाहून खूप समाधान वाटले. भविष्यातील डॉक्टर्स आज इथे क्रिकेटमुळे एकत्र आलेले दिसून येत आहेत. या कार्निव्हलमधील महिलांच्या आठ संघांचा सहभाग असल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी कौतुकाने महिला आज कुठल्याही क्षेत्रात पाठीमागे नसल्याचे नमूद केले. 

मैदानावर खेळताना आम्ही देशासाठी खेळत असतो; आणि इथले विद्यार्थी उद्या समाजासाठी काम करणार आहेत. मैदानावर जिंकण्यासाठी जशी शिस्त, सातत्य आणि मानसिक ताकद आवश्यक असते, तशीच ती आयुष्यासह वैद्यकीय क्षेत्रातही महत्त्वाची आहे. इथल्या विद्यार्थ्यांना एकत्र खेळताना आणि उत्साहाने सहभागी होताना पाहून खूप समाधान वाटत असल्याचे मिथाली राज म्हणाल्या. सर्वांच्या उपस्थितीत त्यांनी मैदानासह खेळाडूंच्या टीम्सची पाहणी केली. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्सवर ऑटोग्राफ देत आभार व्यक्त केले.

त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या यशाची व्याख्या शोधण्याचा, जीवनात संतुलन राखण्याचा आणि नियमित शारीरिक सदृढतेचे महत्त्व लक्षात ठेवण्याचा संदेश दिला. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी तंदुरुस्त शरीर आणि शांत मन किती आवश्यक आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. एसएमबीटी क्रिकेट कार्निव्हल हा केवळ क्रीडा स्पर्धांचा मेळा नसून तो एकतेचा, संघभावनेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव असल्याचे नमूद करत असे कार्यक्रम अविरत ठेवण्यासाठी दूरदृष्टी आणि ध्येय महत्वाचे असल्याचेदेखील त्या म्हणाल्या. 

प्रारंभी, मिथाली राज यांनी एसएमबीटी शैक्षणिक संकुलातील काही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या संवादात त्यांनी घरातल्या व्यक्तींनी कशापद्धतीने प्रोत्साहित केले. यांसह मुलगी म्हणून क्रिकेट जीवनातील अनेक पैलू उलगडले. शिक्षण घेत असताना छंद कसे जोपासावेत यावरही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एसएमबीटीत दरवर्षी क्रिकेट कार्निव्हलचे आयोजन केले जाते. याआधी जहीर खान, इरफान पठाण, अजिंक्य रहाणे व हरभजन सिंग क्रिकेट कार्निव्हलच्या उद्घाटनासाठी येऊन गेले आहेत. त्यामुळे यावर्षी नेमके कोण येणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दरम्यान, जेव्हा यावर्षी महिला क्रिकेटपटू यावर्षी येणार आहे त्यानंतर मात्र सर्वांनाच या क्रिकेट कार्निव्हलचे आकर्षण अधिकच वाढले होते. 

एसमबीटी व्यवस्थापन मनोरंजनाच्या माध्यमातून आपापसातील संबंध दृढ व्हावेत, एका व्हिजनने काम करत असताना ते अधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील असते. असे उपक्रम सर्वत्र आयोजित झाले पाहिजेत असाही विश्वास मिथाली राज यांनी व्यक्त केला. 

चौकट
ग्रामीण भागातील उत्तम क्रीडांगण 
मी अनेक भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जात असते. परंतु येथील मैदानासारखे मैदान कुठेही दिसले नाही. मैदान चांगले राखण्यासाठी देखभाल गरजेची असते. ती तुम्ही याठिकाणी उत्तमरीत्या केलेली असल्याने नक्कीच येथील विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. 

- मिथाली राज, माजी कर्णधार, भारतीय महिला क्रिकेट संघ

Advertisement

Comments

No comments yet.