शिवजयंती निमित्त जिल्ह्यात दोन दिवस होणार हे भरगच्च कार्यक्रम... विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share:
Main Image
Last updated: 09-Feb-2026

जळगाव, (प्रतिनिधी) ९ फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांचा समावेश असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार असून, त्यानंतर किल्ले बनविण्याची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम, विचार व कार्य यांची ओळख करून  देण्यात येणार आहे.

याच अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यप्रयोग छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.
 या कार्यक्रमात नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत कलाकार सहभागी होणार असून, शिवचरित्रावर आधारित सादरीकरणातून उपस्थितांना प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे.

किल्ले बनविण्याच्या स्पर्धेसाठी आवश्यक माती, बॅरिकेडिंग व मार्किंगची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. तसेच चित्रकला स्पर्धेसाठी लागणाऱ्या कागदाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येईल. मात्र, किल्ले सजावटीसाठी लागणारे साहित्य तसेच चित्रकलेसाठी आवश्यक रंग व साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणणे अपेक्षित आहे.

या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत असून, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.

दरम्यान, विद्यार्थ्यांची नाव नोंदणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार असून, यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वांनी एकत्र येऊन शिस्तबद्ध, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.