आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश... खोल समुद्रात घडल्या या नाट्यमय घडामोडी...

Share:
Main Image
Last updated: 08-Feb-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ८ फेब्रुवारी - भारतीय तटरक्षक दलाने 5 आणि 6 फेब्रुवारी 2026 रोजी अत्यंत बारकाईने आखलेल्या समुद्र-हवाई समन्वित कारवाईद्वारे आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश केला. या कारवाईत संघर्षग्रस्त प्रदेशांतून उगम पावलेल्या मोठ्या प्रमाणातील तेल आणि तेलाधारित मालाच्या बेकायदेशीर हस्तांतरणात सहभागी असलेल्या गुंतागुंतीचे जाळे नष्ट केले. 5 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईच्या पश्चिमेला सुमारे 100 नॉटिकल मैलांवर भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी तीन संशयित बोटी अडवल्या. बोटींची सखोल तपासणी, त्यावर सापडलेल्या इलेक्ट्रॉनिक माहितीची पडताळणी, कागदपत्रांची छाननी आणि कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी केल्यानंतर तटरक्षक दलाच्या पथकाला संपूर्ण घटनाक्रम समजला आणि हा गुन्हेगारी प्रकार असल्याची खात्री पटली.

या तस्करी साखळीची कार्यपद्धती अशी होती की स्वस्त तेल समुद्री जहाजांद्वारे वाहून नेले जात असे आणि आंतरराष्ट्रीय पाण्यात समुद्राच्या मधोमध ते मोटर टँकरमध्ये हस्तांतरित केले जात असे. प्राथमिक तपासातून असे निष्पन्न झाले की या साखळीत अनेक देशांत कार्यरत असलेले सूत्रधार सहभागी होते. ते समुद्रातील जहाजांदरम्यान मालाची विक्री आणि हस्तांतरण यांचा समन्वय साधत होते.

भारतीय तटरक्षक दलाच्या तंत्रज्ञान-सक्षम देखरेख प्रणालींनी भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका मोटर टँकरचा शोध घेतल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर जहाजांच्या हालचालींच्या डिजिटल तपासणी आणि माहितीच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून त्या टँकरकडे येत असलेल्या आणखी दोन जहाजांची ओळख पटली. ही जहाजे तेलाधारित मालाचा बेकायदेशीर जहाज-ते-जहाज हस्तांतरण करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, ज्याद्वारे भारतासह किनारी देशांना देय असलेल्या मोठ्या महसुली शुल्कांपासून बचाव केला जात होता.

5 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष जहाजावर चढून डिजिटल पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर सर्व तीन जहाजे ताब्यात घेण्यात आली. प्राथमिक निष्कर्षांनुसार, समुद्री कायदा अंमलबजावणी यंत्रणांपासून बचाव करण्यासाठी ही जहाजे वारंवार आपली ओळख बदलत होती. प्रारंभिक तपासातून जहाजांचे मालक परदेशात असल्याचेही संकेत मिळाले आहेत. पुढील तपासासाठी ताब्यात घेतलेली ही जहाजे मुंबईकडे आणली जाण्याची शक्यता असून, त्यानंतर आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी ती भारतीय सीमाशुल्क विभाग आणि इतर कायदा अंमलबजावणी संस्थांकडे सुपूर्द केली जाणार आहेत.

प्रगत डिजिटल देखरेखीच्या आधारे सुरू करण्यात आलेली आणि भारतीय तटरक्षक दलाच्या वाढत्या सागरी उपस्थितीद्वारे अंमलात आणलेली ही कारवाई, सागरी क्षेत्रात एकूण सुरक्षा पुरवणारा देश म्हणून तसेच समुद्रातील आंतरराष्ट्रीय नियमाधारित व्यवस्थेची ठाम अंमलबजावणी करणारा देश म्हणून भारताची भूमिका पुन्हा अधोरेखित करते.

Advertisement

Comments

No comments yet.