मुंबई महापौर पदावरून भाजपने असा साधला डाव... सोशल इंजिनिअरिंगचे कार्ड...

Share:
Main Image
Last updated: 07-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी - मुंबई महापालिकेच्या आगामी महापौर निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला पत्ता उघड केला असून, आक्रमक महिला नेत्या रितू तावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयाद्वारे भाजपने मुंबईत 'मराठी चेहरा' देत 'सोशल इंजिनिअरिंग'चा मोठा प्रयोग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकाच दगडात दोन पक्षी
रितू तावडे या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ च्या नगरसेविका आहेत. हा भाग गुजराती भाषिक बहुल म्हणून ओळखला जातो, जो भाजपचा बालेकिल्ला आहे. तावडे यांच्या रूपाने एका बाजूला मराठी अस्मितेचा चेहरा समोर ठेवून विरोधकांची कोंडी करणे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या हक्काच्या गुजराती मतदारांना प्रतिनिधीत्व देणे, अशी दुहेरी रणनीती भाजपने आखली आहे.

Advertisement

अनुभवी आणि आक्रमक नेतृत्व
५३ वर्षीय रितू तावडे यांची ही नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. त्यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत प्रभावीपणे सांभाळले आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि सभागृहात विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची आक्रमक शैली ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने भाजपने तावडेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

शिवसेना (शिंदे गट) कडून संजय घाडी उपमहापौरपदाचे उमेदवार
महायुतीच्या जागावाटपानुसार, उपमहापौरपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मागाठाणे प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक संजय घाडी यांना मैदानात उतरवले आहे. यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने मराठी आणि गुजराती मतांच्या बेरजेचे गणित मांडल्याचे दिसून येते.

विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी रितू तावडेंचा 'मराठी चेहरा' किती प्रभावी ठरतो आणि भाजपचा हा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग मुंबईत यशस्वी होतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.