चोरट्यांनी थेट तलाठी कार्यालयात फोडले... हाती हे लागले...

Share:
Last updated: 07-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ फेब्रुवारी - तलाठी कार्यालय फोडून चोरट्यांनी शासकिय रकमेवर डल्ला मारला. ही घटना आडगाव येथे घडली. या घटनेत तलाठी कार्यालय क्र. १ फोडण्यात आले असून चोरट्यांनी सुमारे ३० हजाराची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

कविता भगवान गांगुर्डे (रा.कोणार्क नगर)  यांनी फिर्याद दिली आहे. गांगुर्डे या आडगाव येथील तलाठी कार्यालय क्र. १ चे काम सांभाळतात. गुरूवारी (दि.५) सायंकाळच्या सुमारास त्या महसूली कामकाज आटोपून कार्यालय बंद करून घरी गेल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालय फोडून तलाठी कॅबीनमधील टेबलाच्या ड्रावरमध्ये ठेवलेली व शासकिय कामकाजाची जमा झालेली ३० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. हवालदार देसाई तपास करीत आहेत.

नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळ्या भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ भद्रकाली व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बोरगड भागात राहणारे सागर सोमनाथ कहाणे (रा.शिवपुष्प अपा.सोहम मिसळ जवळ पुष्पक नगर) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. कहाणे यांची मोटारसायकल गेल्या बुधवारी (दि.४) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार वसावे तपास करीत आहेत. दुसरी घटना टाकळीरोडवर घडली. निलेश अशोक देवळे (रा.काठेगल्ली, टाकळीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. देवळे यांची मोटारसायकल शुक्रवारी (दि.६) सकाळच्या सुमारास शिवनेरीनगर येथील चिस्तीया ट्रान्सपोर्ट भागात लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार जाधव तपास करीत आहेत. तिसरी घटना सातपूर औद्योगीक वसाहतीत घडली. प्रदिप जयवंत हिरे (रा. श्रीजी पार्क खांदवेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हिरे यांची  मोटारसायकल बुधवारी (दि.४) रात्री त्यांच्या घरपरिसरात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार बनकर तपास करीत आहेत

Comments

No comments yet.