रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला भरधाव पिकअपने उडवले

Share:
Last updated: 06-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ फेब्रुवारी - शहरातील वडाळा नाका ते खडकाळी दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या एका ५९ वर्षीय पादचाऱ्याला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमिन अलीखान पठाण (५९, रा. खडकाळी, भद्रकाली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात इतका भयंकर की...
मिळालेल्या माहितीनुसार, अमिन पठाण हे गेल्या २८ जानेवारी रोजी दुपारी वडाळा नाक्याकडून खडकाळीच्या दिशेने पायी जात होते. 'सूर्योदय हॉस्पिटल'समोर ते रस्ता ओलांडत असताना द्वारकाकडून सारडा सर्कलच्या दिशेने अत्यंत भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअप (क्रमांक: MH 15 DK 5656) ने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पठाण हे हवेत उडून पुन्हा त्याच वाहनाच्या चाकाखाली आले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या अपघातप्रकरणी हवालदार गुलाब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक दत्तू संपत ढिकले (रा. पिंप्री सय्यद, जानोरी रोड, नाशिक) याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वडाळा नाका ते सारडा सर्कल या मार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असतो. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होत असून, अशा अपघातांमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. भरधाव वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नाशिक : राहत्या घरात पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्द महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गंगापूररोडवरील विद्या विकास सर्कल भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गयाबाई तुकाराम साबळे (रा.अलका सोसा.श्रीरंगनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. साबळे बुधवारी (दि.४) रात्री आपल्या राहत्या घरात बाथरूमला जात असतांना ही घटना घडली होती. अचानक पाय घसरून पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. डोक्यास तसेच हाता-पायास दुखापत झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना दुसºया दिवशी त्याना डॉ. रश्मित वळवी यांनी तपासून मृत घोषीत केले. हवालदार जाधव तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.