नाशिक, (प्रतिनिधी) ६ फेब्रुवारी - वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाला हॉटेलमध्ये धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. कुटुंबातील तरुणीचे मोबाईलमध्ये फोटो काढणाऱ्या संशयितांना जाब विचारला असता, त्यांनी पीडित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की व दमदाटी केली. नाशिक-पुणे महामार्गावरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिंडोरी रोड परिसरात राहणारे एक व्यावसायिक मंगळवारी (दि. ३) रात्री आपल्या कुटुंबासह बहिणीच्या नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नाशिक-पुणे रोडवरील शिंदे टोलनाका परिसरातील 'हॉटेल वृंदावन' येथे गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व कुटुंबीय जेवण करत असताना, बाजूच्या टेबलावर बसलेल्या तिघांपैकी एक जण आपल्या मोबाईलमध्ये कुटुंबातील तरुणीचे फोटो काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
जाब विचारताच आरोपींचा राडा
आपल्या घरातील तरुणीचे चोरून फोटो काढले जात असल्याचे पाहून कुटुंबातील सदस्यांनी संशयितांना याचा जाब विचारला. मात्र, आपली चूक मान्य करण्याऐवजी संशयित स्वप्नील धात्रक, यश गायके व त्यांच्या एका साथीदाराने कुटुंबाशी वाद घातला. संशयितांनी यावेळी पीडित कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस कारवाई व तपास
या घटनेनंतर पीडित व्यावसायिकाने तत्काळ नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी स्वप्नील धात्रक, यश गायके आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त संगिता निकम या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हॉटेलसारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला असून, संशयितांच्या या कृत्याबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.