नाशिक, (प्रतिनिधी) ६ फेब्रुवारी - नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी घेतला असून, याबाबतची अधिकृत घोषणा नगरसेवक रंजन ठाकरे यांनी केली आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भुजबळ फार्म येथील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत असून, आगामी काळात नाशिक शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सर्वपक्षीय समन्वय आवश्यक असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
आगामी कुंभेमळ्याच्या दृष्टीने नाशिकच्या विकासकामांमध्ये कोणतीही अडथळे येऊ नयेत, तसेच शहराला जास्तीत जास्त निधी व प्रकल्प मिळावेत, या दृष्टीने भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या स्पष्ट सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. त्यांच्या या सूचनेनुसार भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी जाहीर केले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक शहराच्या पायाभूत सुविधा, नागरी प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक आणि औद्योगिक विकास या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. राजकारणापेक्षा शहराचा विकास महत्त्वाचा असून, नाशिकच्या हितासाठी एकत्रित भूमिका घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस आनंद सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संजय खैरनार, गटनेत्या सीमा ठाकरे, नगरसेवक ज्योती गांगुर्डे, नगरसेवक किरण राजवाडे, नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नाशिक शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, शहरहिताचे सर्व निर्णय एकमताने घेण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला.