मुंबई, (प्रतिनिधी) ५ फेब्रुवारी - जगातील आघाडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी 'ऑडी'ने (Audi India) भारतीय बाजारपेठेत तंत्रज्ञान आणि लक्झरीचा अनोखा संगम साधणारे ‘माय ऑरास’ (My Aurus) हे फीचर लाँच केले आहे. ड्रायव्हरचा मूड आणि सोय लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले हे अॅप गाडी चालवण्याचा अनुभव अधिक सुखद, शांत आणि वैयक्तिकृत (Personalized) करणार आहे.
काय आहे 'माय ऑरास'?
'माय ऑरास' हे केवळ एक अॅप नसून ते कार आणि ड्रायव्हर यांच्यातील नाते दृढ करणारे एक माध्यम आहे. या तंत्रज्ञानामुळे कारमधील वातावरण पूर्णपणे ड्रायव्हरच्या पसंतीनुसार बदलता येते. यात वन-क्लिक कंट्रोल (One-click Control) सुविधा देण्यात आली असून, एका क्लिकवर लायटिंग, म्युझिक, तापमान, केबिनमधील सुगंध आणि सीट कम्फर्ट यांसारख्या गोष्टी नियंत्रित केल्या जाऊ शकतात.
ठळक वैशिष्ट्ये:
मल्टी-सेन्सरी अनुभव: ॲपल म्युझिकशी जोडलेले हे अॅप वातावरणाशी जुळणारे संगीत, केबिनमधील सुगंध आणि प्रकाश योजना (Ambient Lighting) एकाच वेळी मॅनेज करते.
स्पेशल डे मोड्स: युजरच्या वाढदिवसानिमित्त किंवा विशेष सणासुदीच्या काळात कारमध्ये आपोआप 'बर्थडे मोड' किंवा 'फेस्टिव्ह थीम्स' कार्यरत होतात, ज्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो.
त्रासमुक्त ड्रायव्हिंग: प्रवासादरम्यान येणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरामदायी प्रवासासाठी मेसेज फंक्शन आणि केबिनमधील एअरफ्लोवरही हे अॅप नियंत्रण ठेवते.
सर्व सेवा एकाच ठिकाणी: रोडसाइड असिस्टन्स आणि सर्व्हिसिंगची माहिती एकाच अॅप्लिकेशनवर उपलब्ध असल्याने ग्राहकांचा वेळ वाचणार आहे.
ऑडीच्या 'या' मॉडेल्समध्ये उपलब्ध
ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग धिल्लॉन यांनी सांगितले की, "आमच्या ग्राहक-केंद्रित धोरणामुळे आम्ही हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणले आहे." हे फीचर ऑडी ए४, ए६, क्यू३, क्यू५, क्यू७, क्यू८ आणि ई-ट्रॉन यांसारख्या प्रमुख मॉडेल्समध्ये (MY24 आणि पुढील) उपलब्ध असेल. आयफोन (iOS) वापरकर्त्यांना 'मायऑडी कनेक्ट' अॅपद्वारे याचा अनुभव घेता येईल.
"ड्रायव्हिंग केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसावे, तर तो एक आनंददायी अनुभव असावा, हाच 'माय ऑरास'मागचा मुख्य उद्देश आहे."
— बलबीर सिंग धिल्लॉन, ब्रँड डायरेक्टर, ऑडी इंडिया.