नाशिक, (प्रतिनिधी) ५ फेब्रुवारी - वर्दळीच्या गंगापूररोड भागात मंगळवारी (दि.३) भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फोडली. या घरफोडींमध्ये भामट्यांनी सुमारे ३ लाख ८८ हजार ८०० रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला असून, त्यात दोन लाखाच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पारिजातनगर भागात चोरट्यांनी पहिले घर फोडले. जगदिश निलकंठ कुलकर्णी (रा.गुरूपुष्प अपा.पारिजातनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुलकर्णी कुटूंबिय मंगळवारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ४० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ११ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
दुसरी घरफोडी परिसरातील प्रमोदनगर भागात घडली. उज्वला श्रीकांत शिरसाठ (रा. श्रीकृष्ण वंदन सोसा.शांतीनिकेतन सोसायटी जवळ प्रमोदनगर) यांनी याबाबत पोलीसात धाव घेतली आहे. शिरसाठ कुटूंबिय मंगळवारी दुपारच्या सुमारास अल्पावधीसाठी घराबाहेर पडले असता ही घर फोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड, १ लाख २७ हजार रूपये किमतीचे अलंकार व कॉस्मेटिक वस्तू चोरून नेल्या. दोन्ही घरफोडींचा तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
नाशिक : छत्रपती संभाजी रोडवरील कपालेश्वर नगर भागात झालेल्या घरफोड़ीत चोरट्यांनी सुमारे १ लाख ८४ हजार रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजना चंद्रकांत देशमुख (रा.वेनेस पार्क कपालेश्वरनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देशमुख कुटूंबिय दोन तीन दिवसांसाठी बाहेरगावी गेलेले असतांना ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले १ लाख ८४ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. या गुह्याचा तपास हवालदार राजूळे करीत आहेत.