जनता आर्थिक संकटात... मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी तब्बल ४ कोटींचा सरकारी निधी...

Share:
Main Image
Last updated: 05-Feb-2026

ऑनलाईन डेस्क

नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी - एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आणि सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ एका नव्या वादात अडकल्या आहेत. मरियम नवाज यांनी स्वतःच्या 'मेकअप' आणि सौंदर्यासाठी तब्बल ४ कोटी रुपयांचा सरकारी निधी खर्च केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय आहे प्रकरण?
पाकिस्तानातील स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, मरियम नवाज यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या वैयक्तिक सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर 'सिक्रेट फंड'चा वापर केल्याचा आरोप होत आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, केवळ चेहऱ्याची निगा आणि मेकअपसाठी लागणाऱ्या साहित्यावर ४ कोटी रुपयांची उधळण करण्यात आली आहे.

देश आर्थिक संकटात, तरीही उधळपट्टी!
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि वीज यांसारख्या मूलभूत गरजांसाठी पाकिस्तानी नागरिक संघर्ष करत आहेत. देशावर कर्जाचा डोंगर आहे, अशा परिस्थितीत एका मुख्यमंत्र्याने स्वतःच्या सौंदर्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणे हे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे.

विरोधक आक्रमक:
मरियम नवाज यांच्या या उधळपट्टीवर इम्रान खान यांच्या 'पीटीआय' पक्षाने सडकून टीका केली आहे. "जनतेच्या कराचा पैसा स्वतःच्या चैनीसाठी वापरणे हे लाजीरवाणे आहे. मरियम नवाज यांनी जनतेची माफी मागावी आणि हा खर्च स्वतःच्या खिशातून करावा," अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

सोशल मीडियावरही या बातमीने खळबळ उडवून दिली असून, 'मेकअप मुख्यमंत्री' अशा शब्दांत नेटकरी त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. या प्रकरणावर अद्याप मरियम नवाज किंवा त्यांच्या पक्षाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, या वादामुळे मरियम नवाज यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Comments

No comments yet.