नाशिक, (प्रतिनिधी) ४ फेब्रुवारी - लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका नराधमाने तरुणीवर दीड वर्षांपासून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताने पीडितेच्या विश्वासाचा फायदा घेत नाशिकसह मुंबईत नेऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. लग्नाचा तगादा लावल्यानंतर संशयिताने लग्नास नकार दिल्याने अखेर पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.
ओळखीचे रूपांतर अत्याचारात
मिळालेल्या माहितीनुसार, अमन भीमराव जाधव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. पीडिता आणि अमन यांची २०२४ मध्ये ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत झाले. पीडितेचे आई-वडील घरी नसताना अमनने तिच्या घरी जाऊन भावनिक जवळीक निर्माण केली. "तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशीच लग्न करेन," अशा भूलथापा देत त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.
लॉजवर नेऊन केले अत्याचार
संशयित अमनने पीडितेला सीबीएस परिसरातील 'सम्राट लॉज' येथे बोलावून घेतले. त्या ठिकाणी लग्नाचे आमिष दाखवून त्याने पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. ही मालिका इथेच थांबली नाही, तर गेल्या दीड वर्षांपासून तो पीडितेचे शारीरिक शोषण करत होता. संशयिताने तिला मुंबईला नेऊनही त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
लग्नास नकार दिल्याने बिंग फुटले
या प्रेमप्रकरणाची कुणकुण पीडितेच्या कुटुंबीयांना लागली. त्यानंतर पीडितेने अमनकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, तोपर्यंत केवळ वासना भागवत असलेल्या अमनने लग्नास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि शेवटी स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलीस ठाणे गाठले.
पीडितेच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी अमन जाधवविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाईक करत आहेत.