नाशिक, (प्रतिनिधी) ३ फेब्रुवारी - शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, गेल्या दोन दिवसांत विनयभंग आणि लूटमारीच्या तीन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. सातपूरमध्ये एका तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला, तर इंदिरानगर आणि पंचवटी परिसरात ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करत दागिने लांबवण्यात आले आहेत. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
नाशिक : दुध खरेदी करून घराकडे परतणाऱ्या वृध्द महिलेच्या गळ्यातील पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. या घटनेत तीन तोळे वजनाच्या व दीड लाख रूपये किमतीच्या सोन्याच्या पोतीवर चोरट्याने डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया प्रकाश मुळे (६३ रा. वैष्णव बंगला पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. मुळे सोमवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास परिसरातील अश्वमेधनगर भागात गेल्या होत्या. दुर्गा डेअरी येथून त्या दुध खरेदी करून घराकडे रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. रिक्षा स्टॉप परिसरातून त्या जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
.........
नाशिक : दुकानातून शॅम्पूची पुडी खरेदी करून घराकडे जाणाऱ्या तरूणीचा पाठलाग करीत एकाने विनयभंग केला. फोन करत नाही या कारणातून संशयिताने शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद जनार्दन राजभर (२५ रा. सोमेश्वर कॉलनी,सातपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कामगारनगर भागात राहणाºया पिडीतेने याबाबत फिर्याद दिली आहे. पिडीता शनिवारी (दि.३१) सकाळच्या सुमारास नाईस गाळे असलेल्या भागातील किराणा दुकानात गेली असता ही घटना घडली. दुकानातून शॅम्पूची पुडी खरेदी करून ती घराकडे रस्त्याने पायी जात असतांना पाठलाग करीत आलेल्या संशयिताने तिची वाट अडविली. फोन का करत नाही या कारणातून वाद घालत संशयिताने विनयभंग करीत तरूणीस शिवीगाळ व मारहाण केली. यानंतर त्याने ५० रूपयाची नोट पिडीतेच्या घरासमोर टाकून धूम ठोकली असून या नोटवर फोन करण्याबाबत दम भरला असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या गुह्याचा तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
........
नाशिक : पुढे एका महिलेस चाकू मारण्यात आल्याची भिती घालत तोतया पोलीसांनी एका वृद्द महिलेचे दागिणे हातोहात लांबविले. वडाळा पाथर्डी मार्गावरील जगन्नाथ चौक भागात ही घटना घडली असून, यात सोन्याची शॉर्ट पोत व अंगठी असा सुमारे ९० हजाराच्या अलंकारावर डल्ला मारण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमती बाळकृष्ण वारे (७५ रा.सराफनगर लेन. १ इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली आहे. वारे सोमवारी (दि.२) दुपारच्या सुमारास नेहमी प्रमाणे परिसरातील रामेश्वर महादेव मंदिर येथे देवदर्शनासाठी जात होत्या. समर्थ नगर कडून त्या रस्त्याने पायी जात असतांना जगन्नाथ चौक भागात त्यांना एका भामट्याने गाठले . मावशी तिकडे पोलीस इन्स्पेक्टर साहेब उभे असून तुम्हाला तिकडे बोलावल्याचे सदर इसमाने सांगितले. त्यामुळे वारे या सदर इसमासोबत दुचाकीजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीकडे गेल्या असता ही घटना घडली. सदर व्यक्तीने पुढे एका महिलेच्या छातीत चाकू मारण्यात आला असून तुम्ही सोने घालून फिरू नका असा सल्ला देत दोघा भामट्यांनी मदतीचा बहाणा करून अलंकार लांबविले. वारे यांना गळ्यातील सोन्याची पोत व अंगठी कागदात गुंडाळून पर्स मध्ये ठेवल्याचे दर्शविण्यात आले. मात्र घरी येवून बघितले असता कागदाच्या पुडीत दगड आढळून आल्याने वारे यांनी पोलीसात धाव घेतली असून या गुह्याचा तपास जमादार आव्हाड करीत आहेत.