अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ३ फेब्रुवारी - राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार, निवासी व सीबीएसई अभ्यासक्रमाधारित शिक्षणाची संधी देण्यासाठी 'महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी', नाशिक यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत राज्यातील ३७ शाळांमधील एकूण ३ हजार ९३ जागांसाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्रीय आदिवासी छात्र शिक्षण समिती’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये इयत्ता सहावीच्या २ हजार २२० जागा, तर इयत्ता सातवी ते नववीच्या ८७३ रिक्त जागांचा समावेश आहे. इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी मुला-मुलींना समान संधी असून, प्रत्येकी १ हजार ११० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच इयत्ता सातवीच्या ४००, आठवीच्या २९० व नववीच्या १८३ रिक्त जागा गुणानुक्रमानुसार प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरल्या जातील.
प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया १५ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज पूर्णतः विनामूल्य आहेत. संबंधित अपर आयुक्त कार्यालये, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळा तसेच विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रत्येक शाळेत इयत्ता सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असेल. तसेच सातवी ते नववीच्या रिक्त जागांचा अनुशेष भरून काढताना सर्व प्रवेश हे पूर्वपरीक्षेतील गुणवत्तेनुसार दिले जातील, अशी माहिती सोसायटीच्या सदस्य सचिव लीना बनसोड यांनी दिली.
विभागनिहाय जागांचा तपशील : नाशिक विभाग (१,१९२), नागपूर विभाग (९२३), ठाणे विभाग (५८३) आणि अमरावती विभाग (३९५) ही प्रक्रिया दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कवाडे उघडणारी ठरेल.
प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता व अर्जाची अंतिम मुदत याविषयीची सविस्तर माहिती https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.