नाशिक, (प्रतिनिधी) २ फेब्रुवारी - पतीचे अन्य महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय विवाहितेवर लोखंडी रॉडने हल्ला करून तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जुन्या नाशिकमधील मुगल दरबार हॉटेल परिसरात घडली. या हल्ल्यात विवाहिता गंभीर जखमी झाली असून, झटापटीदरम्यान तिचा सोन्याचा नेकलेसही गहाळ झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तलावडी परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय पीडित महिलेला आपल्या पतीचे मुगल दरबार हॉटेल भागात राहणाऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. संबंधित महिला आपल्या पतीला वारंवार भेटत असल्याची माहिती पीडितेस मिळाली होती. याच गोष्टीचा जाब विचारण्यासाठी ही महिला शनिवारी (दि. ३१) दुपारी संबंधित महिलेच्या घरी गेली होती.
रॉडने प्रहार आणि सोन्याची चोरी
पीडितेने जाब विचारण्यास सुरुवात करताच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संबंधित महिला आणि तिच्या आई-वडिलांनी पीडितेवर हल्ला चढवला. संतापलेल्या कुटुंबियांनी पीडितेला लोखंडी रॉडने मारहाण केली, ज्यामध्ये ती जखमी झाली आहे. या मारहाणीच्या वेळी झालेल्या झटापटीत पीडितेच्या गळ्यातील सोन्याचा नेकलेसही गहाळ झाला असून, तिने मारहाण करणाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
पोलीस कारवाई सुरू
या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ भद्रकाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी मारहाण आणि संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणदिवे करत आहेत. भरवस्तीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाशिक : पिंपळगाव खांब ता. जि.नाशिक येथे २८ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सनी संजय चौधरी (रा.चिंचवाडी,पिंपळगाव खांब) असे मृत युवकाचे नाव आहे. सनी चौधरी याने रविवारी (दि.१) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात स्लॅबच्या अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबीयांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बरेलीकर करीत आहेत.