नाशिकहून राजस्थान गाठता येणार रेल्वेने...

Share:
Main Image
Last updated: 01-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ फेब्रुवारी - नाशिक ते राजस्थानमधील जोधपूर व बीकानेरकडे थेट रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी राजस्थान-हरियाणा-गुजरात प्रवासी संघाच्या वतीने केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजस्थान प्रवासी संघाचे प्रतिनिधी तेजपालसिंह सोढा यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, नाशिक हे धार्मिक, औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर असूनही नाशिकहून राजस्थानकडे थेट रेल्वेसेवा नसणे ही खेदजनक बाब आहे. नाशिक व परिसरात राजस्थान, हरियाणा आणि गुजरातमधील मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून त्यांना धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक तसेच व्यावसायिक कारणांसाठी राजस्थानमध्ये वारंवार प्रवास करावा लागतो. सध्या थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांना वेळ, खर्च आणि गैरसोयींचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

या मागणीची गांभीर्याने दखल घेत मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून नाशिक ते जोधपूर-बीकानेर थेट रेल्वेसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. प्रवासी संघाच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी तेजपालसिंह सोढा, राजेंद्र फड, महेंद्रसिंह राजपूत, सज्जन सिंह, बजरंग शर्मा, राजेंद्र सिंह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवासी संघाच्या वतीने  मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल समाधान व्यक्त करत, लवकरच नाशिक–राजस्थान थेट रेल्वेसेवा सुरू होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

Advertisement

Comments

No comments yet.