नामको बँकेला कोट्यवधींचा गंडा... २६ जणांवर गुन्हा दाखल... असे झाले उघड..

Share:
Main Image
Last updated: 01-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ फेब्रुवारी - नाशिकची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या 'दि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँके'ला (नामको) वाहन कर्ज व्यवहारात सुमारे १ कोटी ९ लाख ४७ हजार ५१० रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०१६ ते २०२२ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे हा कर्ज घोटाळा झाला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात २६ कर्जदार आणि जामीनदारांविरुद्ध ६ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लेखा परीक्षणात घोटाळा उघड
बँकेने दिलेल्या वाहन कर्जांची परतफेड न झाल्याने थकीत कर्जांचे लेखा परीक्षण (Audit) करण्यात आले. या दरम्यान कर्जदारांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आणि बँकेची पद्धतशीर फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. बँकेचे सहाय्यक अधिकारी पंकज सोनजे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Advertisement

असा झाला कर्ज घोटाळा
भामट्यांनी विविध गटांच्या माध्यमातून बँकेकडून वाहन तारण कर्ज उचलले. यात प्रामुख्याने खालील संशयितांचा समावेश आहे:
प्रकरण १: स्वाती शिंदे, वसीम शेख, सचिन जाधव व संकेत घावटे यांनी ६.४० लाखांचे कर्ज घेतले.
प्रकरण २: वसीम शेख, जुबैर शेख, गोरक्ष मोरे, रजियाबी शेख व असलम शेख यांनी १७.२६ लाखांची फसवणूक केली.
प्रकरण ३ व ४: सुमित फड, उद्धव गवळी, सागर फड, शरद घरटे आणि मोहित अग्रवाल यांनी मिळून सुमारे ३४ लाख रुपयांचे कर्ज उचलले.
प्रकरण ५: संकेत घावटे, निसार अहमद सिद्दिकी, खंडेराव झनकर, मोहित अग्रवाल व स्वाती शिंदे यांनी २७.८८ लाखांचा गंडा घातला.
प्रकरण ६: दिनेश शिंदे, गुलाम हैदर सिद्दिकी, सुनील फटके यांनी २३.२६ लाखांचे कर्ज घेऊन बँकेची दिशाभूल केली.

पोलीस तपासाचा फास आवळला
या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुंबईनाका पोलिसांनी या सर्व २६ संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवले असून, तपासासाठी विशेष पथके तैनात केली आहेत.
"या गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक शेख, बेग, सहाय्यक निरीक्षक वाघ आणि सुरवाडे यांच्याकडून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे केला जात आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यात कोणाचे सहकार्य लाभले, याचाही शोध घेतला जात आहे."
 - मुंबई नाका पोलीस

Comments

No comments yet.