नाशिक, (प्रतिनिधी) ३१ जानेवारी - शहरातील नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, याच इच्छेचा गैरफायदा घेत पालकांना गंडा घालणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. नाशिकमधील अशाच एका घटनेत, नामांकित शाळेत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका पालकाकडून १ लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुपाल काळू जाधव (रा. डीजीपी नगर, नाशिक-पुणे रोड) यांना त्यांच्या मुलासाठी परिसरातील एका नामांकित शाळेत प्रवेश हवा होता. यादरम्यान त्यांची ओळख उमेश चव्हाण (रा. पवननगर, सिडको) याच्याशी झाली. चव्हाण याने शाळेत आपली ओळख असल्याचे सांगून प्रवेशाची १०० टक्के खात्री दिली.
या 'ग्वाही'वर विश्वास ठेवून जाधव यांनी डिसेंबर २०२४ मध्ये संशयित चव्हाण याला १ लाख रुपये दिले. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी मुलाचा प्रवेश झाला नाही.
टाळाटाळ अन् पोलीस तक्रार
प्रवेश मिळत नसल्याचे लक्षात येताच जाधव यांनी चव्हाणकडे विचारणा केली आणि आपले पैसे परत मागितले. मात्र, संशयिताने पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांचे आवाहन: पालकांनी कोणत्याही मध्यस्थाला बळी न पडता शाळेच्या अधिकृत प्रवेश प्रक्रियेचाच अवलंब करावा. अशा प्रकारे कोणाशीही पैशांचे व्यवहार करू नयेत.
तपासाची सद्यस्थिती
* गुन्हा दाखल: अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा.
* संशयित: उमेश चव्हाण (रा. पवननगर, सिडको).
* तपास अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक घुनावत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
एटीएम कार्डची अदलाबदल करत भामट्यानी मारला डल्ला
नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदल करीत भामट्यानी महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारला. मदतीचा बहाणा करीत ५० हजार रूपयांची रोकड बँकेतून परस्पर काढून घेण्यात आली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूख्मिणी धनंजय सूर्यवंशी (रा.दत्तमंदिररोड नाशिकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुर्यवंशी या गेल्या शनिवारी (दि.३) सकाळच्या सुमारास पैसे काढण्यासाठी मुक्तीधाम परिसरातील एटीएम बुथवर गेल्या होत्या. अनुराधा टॉकिजच्या बाजूला असलेल्या एसबीआय बँकेच्या बुथमध्ये त्या पैसे काढत असतांना ही फसवणुक झाली. पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पैसे काढण्यास मदत करून त्यांच्या एटीएम कार्डाची अदलाबदल केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ४९ हजार ५०० रूपये परस्पर काढून घेण्यात आले आहेत. या गुह्याचा तपास हवालदार गोसावी करीत आहेत.