नाशिकच्या जेलरोडमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ... एकाच रात्रीत इतकी घरे फोडली

Share:
Last updated: 30-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० जानेवारी - शहरातील जेलरोड परिसरातील दसक भागात चोरट्यांनी गुरुवारी (दि. २९) रात्री धुमाकूळ घालत एकाच इमारतीतील तीन बंद घरे फोडली. चोरट्यांनी या धाडसी घरफोडीत रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून, एकूण ४ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच इमारतीला केले लक्ष्य
चोरट्यांनी दसक येथील एसटीपी प्लॅन्टसमोरील तिरुपतीनगर भागात असलेल्या एका इमारतीची टेहळणी करून ही घरफोडी केली. येथील रहिवासी तुकाराम सखाराम पितळे हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील ४० हजारांची रोकड आणि ६० ग्रॅम सोन्याचे अलंकार असा १ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.

एकामागून एक तीन फ्लॅट साफ
पितळे यांच्या घरानंतर चोरट्यांनी मोर्चा त्याच इमारतीतील इतर दोन बंद घरांकडे वळवला:
ज्योती गोसावी: यांच्या घरातून ५ हजारांची रोकड आणि ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले.
भारत जाधव: यांच्या घराचे कुलूप तोडून दीड लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा १ लाख ६७ हजार रुपयांचा माल लंपास केला.

परिसरात भीतीचे वातावरण
एकाच इमारतीत सलग तीन घरे फुटल्याने जेलरोड परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांनी बंद घरांची पद्धतशीर टेहळणी केल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
पोलीस तपास: या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

काय सांगता, चोरट्यांनी टांगलेल्या पँटमधून पैसे केले लंपास

नाशिक : खिडकीत हात घालून चोरट्यांनी टांगलेल्या पॅण्डच्या खिशातील रोकडवर डल्ला मारला. ही घटना औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. या घटनेत ६५ हजार रूपयांची रोकड काढून भामट्यांनी धुम ठोकली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांताराम पुंडलिक बटावे (रा.देवत्रिवणी रो हाऊस,जिजामाता कॉलनी शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बटावे कुटूंबिय मंगळवारी (दि.२८) रात्री झोपी गेले असता ही घटना घडली. उकाड्यामुळे बटावे कुटूंबियांनी आपल्या घराची खिडकी उघडी ठेवली होती. चोरट्यांनी उघड्या खिडकीत हात घालून दाराच्या पाठीमागे हँंगरला टांगलेली पॅण्ड काढून ही चोरी केली. पॅण्डच्या खिशातील ६५ हजार रूपये भामट्यांनी काढून घेत पोबारा केला आहे. सकाळी पॅण्ड घराबाहेर पडलेली आढळून आल्याने हा प्रकार समोर आला असून या गुह्याचा तपास हवालदार पाटील करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.