कुंभमेळ्यात इतक्या हजार बसेस धावणार... असा आहे मास्टर प्लॅन...

Share:
Main Image
Last updated: 30-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० जानेवारी - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर भाविकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत (ST) घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत वाहतुकीचा 'मास्टर प्लॅन' सादर केला. यानुसार, कुंभमेळ्यासाठी तब्बल ४,५०० बसेस तैनात करण्यात येणार असून, गर्दीच्या नियोजनासाठी पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
स्मार्ट सिटी मिशन कार्यालय, पंचवटी येथे कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही आढावा बैठक पार पडली. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बसस्थानकांचे होणार काँक्रिटीकरण
बैठकीत त्र्यंबकेश्वर, जव्हार फाटा, निमाणी, वणी आणि नाशिक महामार्गावरील प्रमुख बसस्थानकांच्या नूतनीकरण व काँक्रिटीकरणाचा आढावा घेण्यात आला. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. सप्तशृंगी गड येथील कामासाठी भूसंपादनाचा अडथळा दूर करण्यासाठी अटींसह निविदा काढण्याच्या शक्यतेवरही यावेळी चर्चा झाली.

असे असेल बस संचलनाचे जाळे
कुंभमेळ्याच्या काळात अंतर्गत आणि बाह्य पार्किंग स्थळांवरून भाविकांना ने-आण करण्यासाठी ४,५०० बसेसचे नियोजन आहे.
 * प्रमुख केंद्रे: कसबे सुकेणे, ओढा, खेरवाडी, नाशिक रोड, देवळाली कॅम्प आणि इगतपुरी रेल्वे स्थानक.
 * येथून त्र्यंबकेश्वर आणि शहरातील अंतर्गत पार्किंगपर्यंत बसेस धावतील.
 * याचे सूक्ष्म नियोजन एसटीच्या केंद्रीय स्तरावरून केले जाणार आहे.

अनुभवी निवृत्तांची मदत घेणार
वाहतूक नियोजन प्रभावी करण्यासाठी जानेवारी २०२७ पासूनच विशेष अधिकारी नाशिकमध्ये नियुक्त केले जातील. विशेष म्हणजे, मागील सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव असलेल्या निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मानधन किंवा करार पद्धतीने या प्रक्रियेत सामावून घेण्याचा विचार प्रशासन करत आहे.

हायटेक नियोजन: AI चा वापर
यंदाच्या कुंभमेळ्यात प्रवासी संख्येचा अंदाज (Demand Analysis) घेण्यासाठी आणि बसचे मार्ग निश्चित करण्यासाठी Artificial Intelligence (AI) आणि सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे कोणत्या मार्गावर किती गर्दी होईल, याचा अचूक अंदाज घेऊन बस फेऱ्या सोडणे सोपे होणार आहे.
 
स्वतंत्र 'कुंभमेळा कक्ष' स्थापन होणार
प्रत्येक विभागात आता स्वतंत्र 'सिंहस्थ कुंभमेळा कक्ष' (Cell) स्थापन केला जाणार आहे. हा कक्ष जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्याशी समन्वय ठेवून स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करेल.

Advertisement

Comments

No comments yet.