पर्यटनाला तर नेले नाही पण २२ लाखांना गंडवले... पोलीसही चक्रावले...

Share:
Last updated: 30-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० जानेवारी - स्वस्त दरात पर्यटन सहलींचे आणि पंचतारांकित सुविधांचे आमिष दाखवून 'क्लासिक प्राईड कॉ. सर्व्हिसेस' या कंपनीने नाशिककरांची सुमारे २२ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र गोविंद क्षीरसागर (४३, रा. स्नेहनगर, म्हसरुळ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी स्वप्निल कवडे, हरिगोविंद शुक्ला आणि सुनील सरोदे यांनी 'क्लासिक प्राईड कॉ. सर्व्हिसेस' या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना विविध पर्यटन योजनांचे आमिष दाखवले. "कंपनीचे सदस्यत्व घेतल्यास भविष्यात स्वस्त दरात दर्जेदार पर्यटन सुविधा आणि सहलींचे आयोजन केले जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले होते.

Advertisement

२०२४ पासून सुरू होता बनाव
संशयितांनी २०२४ पासून अनेक सभासदांकडून वेळोवेळी पैसे जमा करण्यास सुरुवात केली. फिर्यादी क्षीरसागर यांच्यासह इतर सदस्यांकडून मिळून तब्बल २२ लाख ३५ हजार रुपये गोळा करण्यात आले. मात्र, पैसे भरून बराच काळ लोटल्यानंतरही कोणत्याही सहलीचे आयोजन करण्यात आले नाही. सभासदांनी पैशांबाबत विचारणा केली असता, संशयितांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि अखेर ते पसार झाले.

पोलीस कारवाई
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच क्षीरसागर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

वाचकांसाठी आवाहन: कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीचे सदस्यत्व घेताना किंवा आगाऊ रक्कम भरताना कंपनीची अधिकृत नोंदणी आणि विश्वासार्हता तपासून पाहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet.