नाशिक, (प्रतिनिधी) २९ जानेवारी - शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणावरून वाद घालत एका कुख्यात गुन्हेगाराने घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भारतनगर भागात घडली. केवळ काडीपेटी देण्यास नकार दिल्याने संशयिताने हे नीच कृत्य केले असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
हुक्या उर्फ किरण अशोक खंबाईत (रा. शिवाजीवाडी, भारतनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवरील हा गुन्हेगार भारतनगर भागात दहशत माजवत असल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी आणि तिची आई घरात असताना, बाहेर उभ्या असलेल्या हुक्याने तिला आवाज देऊन काडीपेटी मागितली. मात्र, मुलीने काडीपेटी देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
आईसमोरच मुलीचा विनयभंग
काडीपेटी नाकारल्याचा राग मनात धरून संशयित हुक्याने शिवीगाळ करत थेट मुलीच्या घरात प्रवेश केला. त्याने मुलीच्या आईसमोरच पीडितेचा विनयभंग केला. या अनपेक्षित प्रकारामुळे पीडित मुलगी भयभीत झाली. मायलेकींनी आरडाओरड करण्यास सुरुवात करताच आजूबाजूचे लोक जमण्याची भीती वाटल्याने संशयिताने तिथून पळ काढला.
पोलीस कारवाई आणि तपास
पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलिसांनी संशयिताविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. संशयित सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दोघांची आत्महत्या
नाशिक : पाथर्डी शिवारातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन जणांनी मंगळवारी (दि.२७) गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पाथर्डी फाटा भागातील धनराज रामकृष्ण तेली (३८ रा. मानसी रेसि.चौधरीनगर गौळाणेरोड) यांनी मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दुसरी घटना चेतनानगर भागात घडली. हेमंत भाऊराव गायकवाड (५१ रा. जुनी शारदा शाळा, सेंट फ्रान्सिस शाळेमागे दत्तापार्क) यांनी मंगळवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बाधून गळफास लावून घेतला होता. मुलगा आदेश गायकवाड याने त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले. दोन्ही घटनांबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ््या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार देवरे व जमादार गांगुर्डे करीत आहेत.