नाशिक, (प्रतिनिधी) २९ जानेवारी - मित्रावर ठेवलेला विश्वास एका कुटुंबाला चांगलाच महागात पडला आहे. घरचे लोक बाहेरगावी गेल्याची संधी साधून घरात मुक्कामी राहिलेल्या मुलाच्या मित्रानेच कपाटातील रोकड आणि दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार मखमलाबाद रोड भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
मखमलाबाद रोडवरील वडजाई माता नगर येथे राहणारे दत्ता एकनाथ शिंदे यांचे कुटुंब २१ ते २७ जानेवारी दरम्यान कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच काळात त्यांच्या मुलाचा मित्र सुमिर राजूरे (रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हा शिंदे यांच्या घरी मुक्कामी थांबला होता. घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत सुमिरने बेडरूममधील लोखंडी कपाटावर डल्ला मारला.
लाखोंचा ऐवज चोरीला
शिंदे यांनी घराच्या फर्निचरच्या कामासाठी बँकेतून ८० हजार रुपयांची रोकड काढून कपाटात ठेवली होती. संशयित आरोपीने ही रोकड, ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट आणि २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. कुटुंब घरी परतल्यानंतर कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसले आणि चोरीचा प्रकार उघड झाला.
पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल
दत्ता शिंदे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित सुमिर राजूरे याच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. घरातील व्यक्तीप्रमाणेच वावर असलेल्या मित्रानेच हा हात साफ केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पोलीस हवालदार आहिरे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
घरफोडीत साडे तीन लाखांचा ऐवज लंपास
नाशिक : नाशिकरोड येथील जयभवानी रोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ४० हजारांच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरीनाथ मंगु विसपुते (रा.गणाधिश बंगला,आडकेनगर नं.२,जयभवानीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विसपुते कुटूंबिय २४ ते २७ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. चोरट्यांनी बंद बंगल्याच्या डायनिंग रूमच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ४६ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.