अजित पवारांच्या अपघाताबाबत विमान कंपनी मालकाची उडवाउडवी... थेट म्हणाला...

Share:
Main Image
Last updated: 29-Jan-2026

पुणे, (प्रतिनिधी) २९ जानेवारी - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असतानाच, ज्या कंपनीच्या विमानातून ते प्रवास करत होते, त्या कंपनीच्या मालकाने दिलेली प्रतिक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 'व्हीएसआर एव्हिएशन' (VSR Aviation) चे मालक व्ही. के. सिंह यांनी विमानातील तांत्रिक बिघाडाची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावत या भीषण अपघाताचे खापर थेट वैमानिकावर फोडले आहे.

काय म्हणाले व्ही. के. सिंह?
अपघातानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्ही. के. सिंह यांनी अत्यंत 'अजब' दावा केला. ते म्हणाले की, "आमच्या माहितीप्रमाणे विमान अत्यंत चांगल्या स्थितीत होते आणि त्यात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. विमानाची देखभाल वेळोवेळी केली जात होती. हा अपघात तांत्रिक कारणामुळे नसून वैमानिकाच्या निर्णयामुळे झाला असावा."
सिंह यांनी पुढे असेही म्हटले की, "विमान कुठे लँड करायचे, हा सर्वस्वी वैमानिकाचा निर्णय होता. मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाने आधी धावपट्टी २९ वर उतरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर धावपट्टी ११ कडे वळले. पायलटला धावपट्टी (रनवे) स्पष्ट दिसत नव्हता, त्यामुळे हा अपघात झाला असावा." विशेष म्हणजे, या अपघातात मृत्युमुखी पडलेले मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर हे अत्यंत अनुभवी होते, तरीही मालकाने दिलेली ही प्रतिक्रिया संताप व्यक्त करणारी ठरत आहे.

तीन वर्षांतील दुसरी मोठी दुर्घटना
या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण व्हीएसआर एव्हिएशनच्या विमानाचा हा गेल्या तीन वर्षांतील दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये याच कंपनीचे एक विमान मुंबई विमानतळावर धावपट्टीवरून घसरले होते. वारंवार होणाऱ्या या अपघातांनंतरही कंपनीच्या मालकाने आपली जबाबदारी स्वीकारण्याऐवजी ती मृतांच्या माथी मारल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

तपासाकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) आणि विमान अपघात तपास विभाग (AAIB) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' मिळाल्यानंतरच अपघाताचे नेमके तांत्रिक कारण समोर येईल. मात्र, तपास पूर्ण होण्याआधीच कंपनी मालकाने स्वतःला क्लीन चिट देणे ही बाब संशयास्पद मानली जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.