पुणे (प्रतिनिधी), २८ जानेवारी - आपल्या करारी बाण्याने आणि प्रशासनावरील पकडीने महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात पायलटसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ८:१० वाजता त्यांच्या विमानाने मुंबईतून टेक-ऑफ केले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बारामती एमआयडीसी विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचा ताबा सुटला आणि धावपट्टीपासून काही अंतरावर विमानाचा भीषण स्फोट झाला.
या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे पीएसओ विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
असा आहे नियतीचा खेळ: 'सहा'चा योगायोग
अजित पवार यांच्या आयुष्याशी संबंधित एक विचित्र आणि चटका लावून जाणारा योगायोग समोर आला आहे. महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री भूषवणाऱ्या दादांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतके होते. नेहमी वेळेचे पालन करणाऱ्या दादांच्या बाबतीत नियतीच्या घड्याळाची वेळ आज चुकली, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
राजकीय प्रवासाचा अंत
२२ जुलै १९५९ रोजी जन्मलेल्या अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक विक्रम प्रस्थापित केला होता. २०१० पासून सुरू झालेला हा प्रवास २०२४ च्या शपथविधीपर्यंत अखंड सुरू होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा स्तंभ कोसळला आहे.
अंत्यविधी उद्या बारामतीत
अजित पवार यांचे पार्थिव आज रात्री उशिरापर्यंत बारामतीतील विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मृतांची नावे:
१. अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)
२. विदीप जाधव (पीएसओ)
३. कॅप्टन सुमित कपूर (पायलट)
४. कॅप्टन संभवी पाठक (सह-पायलट)
५. पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)