मुंबई (प्रतिनिधी) २८ जानेवारी - राज्यातील विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी रिलायन्स जिओने कंबर कसली आहे. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने जिओने महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'एआय क्लासरूम' आणि 'गूगल जेमिनी' प्रशिक्षणाचा धडाका लावला असून, आतापर्यंत १,००० हून अधिक शाळांमधील ७,२०० पेक्षा जास्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
प्रगत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष धडे
जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत राज्यभर संवादात्मक सत्रांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये केवळ माहिती न देता प्रत्यक्षात एआय टूल्स कसे वापरावेत, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी, कोडिंग, प्रोजेक्ट आयडिएशन, नोट्स तयार करणे आणि अगदी मुलाखतीची तयारी करण्यासाठी एआयचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन या सत्रांतून मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेली फीचर्स:
गूगल जेमिनी लाइव्ह: आपल्या पसंतीच्या भाषेत प्रश्नांची उत्तरे देण्याच्या सुविधेमुळे विद्यार्थी या फीचरकडे अधिक आकर्षित होत आहेत.
नोटबुकएलएम: प्रभावी 'प्रॉम्प्ट' तयार करून शैक्षणिक संशोधन अधिक सुलभ करण्यासाठी हे टूल उपयुक्त ठरत आहे.
जिओ एआय क्लासरूम: तरुण पिढीसाठी ४ आठवड्यांचा विनामूल्य ऑनलाइन कोर्स (jio.com/ai-classroom) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
"डिजिटल कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिओ आपल्या अनलिमिटेड ५जी ग्राहकांना ₹३५,१०० मूल्याचा ‘गूगल जेमिनी प्रो प्लॅन’ १८ महिन्यांसाठी मोफत देत आहे. यात २ टीबी क्लाउड स्टोरेजसह नॅनो बनाना प्रो आणि वीईओ ३.१ सारखी प्रगत फीचर्स उपलब्ध आहेत."
मोफत प्रीमियम सुविधा
जिओच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना 'माय जिओ' अॅपद्वारे प्रीमियम एआय टूल्सचा अॅक्सेस दिला जात आहे. यामध्ये एआय-आधारित प्रतिमा निर्मिती आणि व्हिडिओ निर्मितीसाठी अत्याधुनिक मॉडेल्सचा समावेश आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन महाराष्ट्राला 'एआय हब' बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.