मुंबई, (प्रतिनिधी) २६ जानेवारी - बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असल्यास तुम्हाला थेट बुधवारची वाट पाहावी लागणार आहे. '५ दिवसांचा कामकाजाचा आठवडा' या प्रमुख मागणीसाठी 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने (UFBU) २७ जानेवारी (मंगळवार) रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे, त्याआधी सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने बँकांचे कामकाज सलग चार दिवस ठप्प राहणार आहे.
या संपामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँकांचा सहभाग मोठा आहे. मात्र, ICICI बँक, HDFC बँक आणि कोटक महिंद्रा यांसारख्या नवीन पिढीतील खासगी बँकांच्या कामकाजावर या संपाचा मोठा परिणाम होणार नाही. या बँकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची शक्यता आहे. तरीही, चेक क्लिअरन्सची प्रक्रिया सरकारी बँकांशी जोडलेली असल्याने तिथे काही प्रमाणात विलंब होऊ शकतो.
नेमकी मागणी काय?
बँक कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून '५ दिवसांचा आठवडा' लागू करण्याची मागणी करत आहेत. मार्च २०२४ मध्ये 'इंडियन बँक्स असोसिएशन' (IBA) सोबत झालेल्या वेतन करारावेळी या मागणीवर सहमती झाली होती, परंतु सरकारने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आरबीआय (RBI) आणि एलआयसी (LIC) मध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू असताना बँकांना का वगळले? असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे.
या सेवांवर होणार परिणाम:
चेक क्लिअरन्स: धनादेश वटवण्यासाठी किमान ३ ते ४ दिवस वाट पाहावी लागेल.
कॅश विड्रॉल/डिपॉझिट: बँक शाखांमधील रोख व्यवहार पूर्णपणे बंद राहतील.
एटीएम सेवा: सलग सुट्ट्यांमुळे काही ठिकाणच्या एटीएममधील रोकड संपण्याची शक्यता आहे.
लोन आणि इतर कामे: केवायसी अपडेट किंवा कर्जाशी संबंधित कामे प्रलंबित राहतील.
डिजिटल व्यवहार राहतील सुरू:
बँक शाखा बंद असल्या तरी नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन बँकांतर्फे करण्यात आले आहे.