आयफोन खरेदी करायला लावून तरुणाला गंडा... सिडकोतील दोन ठकबाज जेरबंद...

Share:
Last updated: 24-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ जानेवारी -  कन्झ्युमर लोनवर आयफोन खरेदी करण्यास भाग पाडून एका तरुणाची ७१ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत भामट्यांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. सिडको भागातून या संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यांना पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सतीश उर्फ सचिन शेषराव खिल्लारे (वय २१, रा. सिंहस्थनगर, सिडको) आणि गणेश युवराज जगदाळे (वय २३, रा. उत्तमनगर, सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

असा घडला प्रकार: तक्रारदार तरुणाला पैशांची नड असल्याने तो दोन महिन्यांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरातील रिलायन्स मॉल येथे गेला होता. तेथे त्याची भेट या दोन संशयितांशी झाली. त्यांनी तरुणाला 'कन्झ्युमर लोन'चा सल्ला दिला आणि रिलायन्स मॉलमधूनच ७१ हजार रुपये किमतीचा 'आयफोन १६' कर्ज काढून घेण्यास भाग पाडले. "आम्ही हा मोबाईल घेतो, तुम्हाला संध्याकाळपर्यंत रोख रक्कम मिळवून देतो," असे आमिष त्यांनी दाखवले. विश्वासाने तरुणाने मोबाईल त्यांच्या हवाली केला, मात्र संशयितांनी पैसे न देता टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

पोलीस कारवाई: गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही संशयित पसार झाले होते. गुन्हे शाखा युनिट दोनचे हवालदार चंद्रकांत गवळी व मनोहर शिंदे यांना हे संशयित सिडकोतील उत्तमनगर भागात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अतुल डेअरी परिसरात सापळा रचून दोघांना झडप घालून पकडले.

या पथकाने बजावली कामगिरी: ही कारवाई सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, अंमलदार प्रवीण वानखेडे आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने केली. सध्या इंदिरानगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशाच प्रकारे त्यांनी अजून कुणाला फसवले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.