भारतात प्रथमच १२० किलो वजनाच्या महिलेवर ही सर्जरी यशस्वी

Share:
Main Image
Last updated: 24-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २४ जानेवारी - येथील प्रसिद्ध जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने वैद्यकीय क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. अति-लठ्ठपणामुळे (Bariatric weight) हालचाल करणे अशक्य झालेल्या एका ४५ वर्षीय महिलेवर 'मोनोपोर्टल एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी' यशस्वीपणे पार पडली. ५२ बीएमआय (BMI) असलेल्या रुग्णावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया होण्याची ही भारतातील पहिलीच घटना असल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले आहे.

काय होती परिस्थिती? मूळची भारतीय असलेली ही महिला जर्मनीमध्ये वास्तव्यास आहे. वार्षिक सुट्टीसाठी भारतात आली असताना तिला पाठदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. तपासणीअंती 'एल४-एल५ डिस्क हर्निएशन' (नसांवर दबाव) असल्याचे निदान झाले. १२० किलो वजन आणि ५२ बीएमआय असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. अनेक ठिकाणी तिला शस्त्रक्रियेसाठी नकार मिळाल्याने ती दोन महिने अंथरुणाला खिळून होती. यामुळे तिची जर्मनीतील नोकरी जाण्याची भीती देखील निर्माण झाली होती.

अशी झाली यशस्वी शस्त्रक्रिया

Advertisement

जसलोक हॉस्पिटलमधील एंडोस्कोपिक स्पाइन टीमने हे आव्हान स्वीकारले. डॉ. मनिष कोठारी यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. यामध्ये केवळ १ सेंटीमीटरपेक्षा कमी आकाराचा छेद देऊन नसांवरील दाब यशस्वीपणे कमी करण्यात आला. भूल देण्याची महत्त्वाची जबाबदारी डॉ. राजश्री देवपुजारी आणि डॉ. अनुराज जैन यांनी पार पाडली.

शस्त्रक्रियेनंतर २० किलो वजन घटले शस्त्रक्रिया इतकी यशस्वी झाली की, रुग्णाला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. वेदनामुक्त झाल्यानंतर या महिलेने व्यायाम आणि संतुलित आहारावर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे अवघ्या दोन महिन्यांत तिचे २० किलो वजन कमी झाले. सध्या ती पुन्हा जर्मनीला आपल्या कामावर रुजू झाली आहे.

"अशा उच्च बीएमआय असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करताना अचूकता राखणे मोठे आव्हान होते. मात्र, प्रगत मोनोपोर्टल एंडोस्कोपिक तंत्रज्ञानामुळे आम्ही नसांवरील दाब सुरक्षितपणे काढू शकलो. यातून हेच सिद्ध होते की, प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ कौशल्य असल्यास अशक्य वाटणाऱ्या केसेसही यशस्वी होऊ शकतात." - डॉ. मनिष कोठारी, कन्सल्टंट (एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी)

"अति वजनामुळे या महिलेवर शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. मात्र, जसलोक हॉस्पिटलच्या किमान इन्व्हेसिव्ह उपचार पद्धतीमुळे हे शक्य झाले. ही केस प्रगत एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाचे यश अधोरेखित करते." - डॉ. मिलिंद खडके, चीफ मेडिकल ऑफिसर, जसलोक हॉस्पिटल

Comments

No comments yet.