पाच कोटींची खंडणी मागितली... पोलिसांनी मग...  

Share:
Last updated: 24-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ जानेवारी - मुंबईतील एका महिलेकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात संशयित विशाल चंद्रकांत पवार याला बेड्या ठोकण्यात नाशिकरोड गुन्हे शाखेला यश आले आहे. इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी परिसरातील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नेमके प्रकरण काय?

मुंबईस्थित लिना लुल्ला यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. विशाल पवार आणि त्याच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे लुल्ला यांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केला होता. ही मालमत्ता सोडण्यासाठी संशयिताने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी पवन पवार, विशाल पवार आणि त्यांच्या इतर ११ साथीदारांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीच त्याचे काही साथीदार पोलिसांच्या ताब्यात होते, मात्र विशाल फरार झाला होता.

इगतपुरीत पडला छापा:

शहरातील नाशिकरोड, अंबड, उपनगर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे पोलीस विशालच्या मागावर होते. तो कसारा घाटातील घाटनदेवी परिसरातील 'साई कार हॉटेल'मध्ये लपून बसल्याची खात्रीशीर माहिती उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांना मिळाली. या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून धाड टाकली आणि विशाल पवारच्या मुसक्या आवळल्या.

यांनी केली कारवाई:

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये नाशिकरोड युनिटचे प्रभारी उपनिरीक्षक संदीप पवार, प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई, जमादार मंगला जगताप, हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रेय चकोर आदींच्या पथकाचा समावेश होता.

पुढील तपास: अटकेनंतर विशाल पवारला इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्या अटकेमुळे शहरातील भूखंड माफियांमध्ये आणि गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध आता अधिक तीव्र करण्यात आला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.