शिर्डीतील ११५७ बांधकाम मजुरांना मिळाले 'सुरक्षा कवच'...

Share:
Main Image
Last updated: 23-Jan-2026

शिर्डी, (प्रतिनिधी) २३ जानेवारी - देशभरातून येणाऱ्या साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत विकासाची कामे वेगाने सुरू असतानाच, या विकासाचे शिल्पकार असलेल्या बांधकाम मजुरांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग, गोदरेज कंपनी व त्यांच्या सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत शिर्डीतील ११५७ बांधकाम कामगारांची अधिकृत नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या कामगारांना सुरक्षा साहित्य व ओळखपत्र प्रदान करण्यात आले असून, त्यांच्या कल्याणासाठी ९५ लाख रुपयांचा शासकीय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर अनेकदा स्थलांतरित असतात. ओळखपत्रांचा अभाव आणि क्लिष्ट प्रक्रियेमुळे ते शासकीय लाभांपासून वंचित राहतात. ही अडचण ओळखून प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सामाजिक सुरक्षा' या संकल्पनेवर भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत मजुरांना केवळ नोंदणीकृतच केले नाही, तर त्यांना बांधकाम कामगार मंडळ ओळखपत्र देऊन अधिकृत दर्जा मिळवून दिला आहे.

Advertisement

मजुरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने शिर्डीत विशेष जनजागृती शिबिरे आयोजित केली. यामध्ये कामगारांना प्रत्यक्ष मदत, मार्गदर्शन, समुपदेशन व आरोग्य तपासणी अशा विविध टप्प्यांतून साहाय्य पुरवण्यात आले. कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत, त्यांना आरोग्य सुविधा व  कामाच्या ठिकाणी सुरक्षितता प्रदान करणे हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.

शासनाच्या या सकारात्मक हस्तक्षेपामुळे शिर्डीतील बांधकाम मजुरांना आता हक्काचे 'सुरक्षा कवच' मिळाले असून, ९५ लाखांच्या निधीतून त्यांच्या भविष्यातील आर्थिक व सामाजिक सुरक्षेचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.

Comments

No comments yet.