नाशिक, (प्रतिनिधी) २२ जानेवारी - बँक खात्यातून मनी लॉंड्रिंग झाल्याची बतावणी करीत भामट्याने चौकशी एजन्सीचा धाक दाखवत शहरातील वयोवृध्द सेवानिवृत्ताकडून तब्बल साडे अठरा लाख रूपयांची धमकी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक,खंडणीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ परिसरातील वृद्दाने याबाबत फिर्याद दिली आहे. सदर व्यक्ती खासगी नोकरीतून निवृत्त झाले असून गेल्या महिन्यात सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. महाविर सिंग नामक भामट्याने डाटा प्रोटेक्शन बोर्ड आॅफ इंडिया या शासकिय संस्थेतून बोलत असल्याचे सांगून ही फसवणुक केली. तुमच्या मोबाईलनंबरवरून लोकांना धमकी, खंडणी व अश्लिल व्हिडीओ कॉल जात असल्यामुळे कुलाबा (ठाणे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तुमच्या कॅनरा बॅकेच्या खात्यातूनही मनी लॅण्डीग करण्यात आल्याने मुंबई पोलीस ईडी आणि एनआयए या तिन एजन्सी या प्रकरणाचा तपास करीत असल्याची धमकी देत ही खंडणी उकळण्यात आली. मनी लॅण्डींग या आंतरराष्ट्रीय प्रकरणातील आरोपीतांकडून कुटूंबियास धोका असल्याची बतावणी करीत भामट्यांनी या प्रकरणाची चौकशी होई पर्यंत या घटनेची वाच्यता करण्यास मनाई करून वृध्दास दर तासाला सुरक्षीततेबाबत संदेश पाठविण्यास भाग पाडले. या काळात विश्वास संपादन करून भामट्यांनी वृद्दास बँक खात्यातील रकमा त्यांनी सांगितलेल्या बँक व वॉलेट खात्यात वर्ग करण्यास सागून १८ लाख ४० हजार रूपयांची खंडणी उकळली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.