मुंबई, (प्रतिनिधी) १९ ऑक्टोबर - दिवाळीच्या सणाचा आनंद आणि महाराष्ट्रातील पारंपरिक फराळाची चव परदेशात राहणाऱ्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलने एक विशेष आणि अत्यंत सुलभ उपक्रम सुरू केला आहे. इंडिया पोस्टच्या (India Post) आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेद्वारे नागरिक आता अत्यंत परवडणाऱ्या दरात, सोयीस्कर पॅकेजिंगसह आणि घरपोच पार्सल संकलन सुविधेचा (Free Home Collection) लाभ घेऊन दिवाळी फराळ व भेटवस्तू परदेशात पाठवू शकतात.
आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी किफायतशीर दर
इंडिया पोस्टने विविध देशांसाठी १० किलोग्रॅमपर्यंतच्या पार्सलसाठी आकर्षक व परवडणारे दर निश्चित केले आहेत:
जपान: ₹४,७९७
जर्मनी: ₹५,८७६
युनायटेड किंगडम (UK): ₹६,४६१
फ्रान्स: ₹६,६३८
रशिया: ₹६,७५०
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA): ₹९,०५१
कॅनडा: ₹९,६७६
ऑस्ट्रेलिया: ₹११,९१२
पोस्ट ऑफिसमध्ये पॅकेजिंग सुविधा आणि 'फ्री होम कलेक्शन'
सुरक्षित पॅकेजिंग: महाराष्ट्रातील प्रमुख जनरल पोस्ट ऑफिस (GPO) आणि मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये फराळाचे डब्बे जलद व सुरक्षितपणे पॅक करण्यासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे, ज्यामुळे काही मिनिटांत पार्सल तयार होते.
मोफत घरपोच संकलन सुविधा: व्यस्त वेळापत्रकामुळे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी पोस्टमन थेट घरी येऊन पार्सल गोळा (Home Collection) करतील.
नागरिकांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र पोस्टल सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जयभाये यांनी नागरिकांना पार्सल बुक करताना ‘कस्टम डिक्लेरेशन फॉर्म’ काळजीपूर्वक भरण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक वस्तूचा योग्य एचएसएन (HSN) कोड नमूद करणे अनिवार्य आहे. फराळासोबत कपडे किंवा इतर भेटवस्तू असल्यास त्यांचे वर्णन व मूल्य स्वतंत्रपणे दर्शवावे, जेणेकरून परदेशातील कस्टम क्लिअरन्सदरम्यान कोणताही विलंब होणार नाही.
परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईक आणि मित्रांसाठी ही दिवाळी खास बनवण्यासाठी नागरिकांनी इंडिया पोस्टच्या या विशेष सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.