म्हसरूळमधील हा युवक घरात बसून करत होता हा भीषण उद्योग... तब्बल ३८ गुन्हे उघडकीस...

Share:
Main Image
Last updated: 19-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १९ ऑक्टोबर - नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर गुन्हेगाराला नाशिकच्या म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राहुल धुळे (वय २४) असे या अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या (NCCRP) माध्यमातून त्याच्या डिजिटल ट्रेलची पडताळणी केली असता तो देशभरात विविध ठिकाणी दाखल असलेल्या तब्बल ३८ सायबर गुन्ह्यांमध्ये हवा असल्याचे उघडकीस आले आहे.

कशी उघडकीस आली फसवणूक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर रोजी फसवणूक आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमांरम्यान एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपीने एका नामांकित रोजगार ॲपवर (Employment App) बनावट नोकरदाता (Fake Recruiter) प्रोफाइल तयार केले होते. या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना चांगल्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून एका फिर्यादीची तब्बल ६ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

पोलिसांची धडक कारवाई आणि जप्ती

गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज गवारे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहाके यांच्या पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला. गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीचे विश्लेषण करून लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी त्याच्याकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:

Advertisement

४ मोबाईल फोन

१३ सिम कार्ड

१२ वेगवेगळ्या बँकांचे डेबिट व क्रेडिट कार्ड

२ बँक चेकबुक

गुन्हेगारीची पद्धत आणि पुढील तपास

तपासादरम्यान समोर आले की, मूळचा वाहनचालक (Driver) असलेला हा तरुण रोजगार वेबसाइट्सचा वापर करून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार शिकला होता. नाशिकमधील गुन्ह्याव्यतिरिक्त त्याने इतर गुन्ह्यांमध्येही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी संशयिताला न्यायालयासमोर सादर केले असता, न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा कसून शोध म्हसरूळ पोलीस घेत आहेत.

 

Comments

No comments yet.