नाशकात भरदिवसा गोळीबार... तपासात समोर आले हे धक्कादायक कारण...

Share:
Main Image
Last updated: 19-Oct-2026

 

 नाशिक, (प्रतिनिधी) १९ ऑक्टोबर - शहरातील आडगाव शिवारात रविवारी (१८ ऑक्टोबर) दुपारी भरदिवसा एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. वैयक्तिक जुन्या वादातून व सूडबुद्धीने दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्खोरांनी एका ३१ वर्षीय शेतकऱ्याचा रस्ता अडवून त्याच्यावर पिस्तूल काढून प्राणघातक गोळीबार केला. सुदैवाने, हल्लेखोरांचा नेम चुकल्यामुळे संबंधित शेतकरी या हल्ल्यातून बालंबाल वाचला असून या घटनेने संपूर्ण नाशिक परिसर आणि शेतकरी वर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश माळोदे (वय ३१) हे तरुण शेतकरी जुन्या न्यू इंग्लिश स्कूल रस्त्यावरील म्हसरूळ मार्गावर असलेल्या म्हाडा सोसायटी जवळून आपल्या शेतातील काम आटोपून घराकडे दुचाकीवरून निघाले होते. ते या मार्गावर आले असता, पाठोपाठ आलेल्या एका दुचाकीवरील दोन संशयित तरुणांनी त्यांना गाठले व त्यांची गाडी अचानक अडवली.

उमेश माळोदे यांनी गाडी थांबवताच दोन्ही संशयितांनी त्यांच्याशी शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयितांपैकी एकाने अचानक कमरेला लावलेले पिस्तूल बाहेर काढले आणि थेट उमेश यांच्यावर रोखून दोन गोळ्या झाडल्या (राउंड फायर केले). गोळीबाराच्या अचानक झालेल्या आवाजाने उमेश प्रसंगावधान राखून बाजूला झाले, ज्यामुळे गोळीचा नेम चुकला आणि गोळ्या त्यांना न लागता निघून गेल्या. यामुळे उमेश माळोदे यांचा जीव बालंबाल वाचला. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात नागरिक भयभीत झाले, आणि याचाच फायदा घेत दोन्ही संशयित आरोपी दुचाकीवरून वेगाने पसार झाले.

गोळीबारामागील कारण काय?

गोळीबाराची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आडगाव पोलीस ठाण्याचे पथक व पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

Advertisement

पोलीस तपासात व उमेश यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, या प्राणघातक हल्ल्यामागे जुना वैयक्तिक वाद आणि पूर्ववैमनस्य असल्याचे समोर आले आहे. उमेश माळोदे यांची पत्नी आणि मुख्य संशयित आरोपी राहुल आंबेकर हे दोघे पूर्वी एकाच कंपनीत एकत्र काम करत होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणावरून गंभीर वाद निर्माण झाला होता. या वादांनंतर माळोदे यांच्या कुटुंबीयांनी पत्नीला ती नोकरी सोडण्यास सांगितले होते.

मात्र, नोकरी सोडल्यानंतरही संशयित राहुल आंबेकर याच्या मनात माळोदे कुटुंबाबद्दल प्रचंड राग व आकस कायम होता. याच रागाच्या भरात आणि सूड घेण्याच्या उद्देशाने राहुल आंबेकर याने आपल्या एका साथीदारासह मिळून उमेश यांच्यावर पाळत ठेवली आणि त्यांना एकटे गाठून त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला केला.

पोलीस कारवाई आणि पुढील तपास

या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न (Attempt to Murder) करणे आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार (Arms Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी घटनेची पाहणी करून माहिती दिली की, "दोन्ही संशयित आरोपींची ओळख पटली असून ते नाशिक रोड परिसरातील रहिवासी आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. संशयितांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील."

भरदिवसा मुख्य रस्त्यावर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे नाशिकमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसलेले आहे.

 

Comments

No comments yet.