नाशिकमध्ये होणार हे दोन वर्ल्ड रेकॉर्ड... कुंभमेळा ध्वजारोहणाची जय्यत तयारी...

Share:
Main Image
Last updated: 19-Oct-2026

 

मनोहर शिंदे, (नाशिक) १९ ऑक्टोबर - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भक्तिभाव, सामाजिक सहभाग आणि व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने दोन भव्य आणि ऐतिहासिक विश्वविक्रमांचे (World Records) नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत येत्या २५ ऑक्टोबर रोजी ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद, तर ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी थेट रामकुंडावर सुमारे ६ हजार ५०० जनजाती बांधवांकडून महा-गोदावरी आरती केली जाणार आहे, अशी माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, भक्तिचरण दास महाराज, रामतीर्थ गोदा सेवा समितीचे जयवंत गायधनी आणि गोदा आरती समन्वयक प्रदीप बच्छाव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पहिला विश्वविक्रम: ५०१ जणांचा सामूहिक ‘अनंत विजय शंखनाद’

सिंहस्थ कुंभमेळ्याचा दिव्य संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी प्राधिकरणाकडून विविध सेवाभावी संस्था व नागरिकांना एकत्र आणून उपक्रम राबवले जात आहेत. यातील पहिला विश्वविक्रम ‘अनंत विजय शंखनाद ग्रुप’च्या सहकार्याने २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत यशवंत महाराज पटांगण येथे पार पडणार आहे. यामध्ये ५०१ साधक एकत्र येऊन सामूहिक शंखनाद करतील. विशेष म्हणजे, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यादरम्यानही असाच शंखनाद केला जाणार आहे.

दुसरा विश्वविक्रम: ६,५०० जनजाती बांधवांकडून भव्य गोदा आरती

ध्वजारोहणाच्या दिवशी, म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ऐतिहासिक रामकुंडावर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सहकार्याने भव्य सामूहिक गंगा-गोदावरी आरती आयोजित केली जाणार आहे. या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात जिल्ह्यातील दुर्गम भागातील हजारो जनजाती (आदिवासी) बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अहिल्याबाई होळकर पुलापासून ते थेट रामकुंड परिसरापर्यंतचा संपूर्ण परिसर या ऐतिहासिक आरतीसाठी विशेषरित्या राखीव ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

सात तालुक्यांतील ६५० गावांचा सहभाग; ६,५५९ जणांची नोंदणी

गोदा आरतीचे समन्वयक प्रदीप बच्छाव व जयवंत गायधनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांमधील ६५० गावांतील आणि नाशिक शहरातील २८ वस्त्यांमधील नागरिक व जनजाती बांधव या सोहळ्यात सहभागी होत आहेत. यासाठी गावागावांत विशेष प्रशिक्षण व नियोजन सुरू असून, आतापर्यंत ६ हजार ५५९ नागरिकांनी या महा-आरतीसाठी अधिकृत नोंदणी केली आहे.

महानगरपालिकेकडून रामकुंड परिसराचे स्वच्छता व नियोजन

सोहळ्याची भव्यता आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेकडून पूर्ण सहकार्य पुरवले जात आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की, रामकुंड घाटाचा संपूर्ण परिसर चकाचक करण्यासोबतच भाविकांच्या सुविधेसाठी, सुरक्षेसाठी आणि परिसराच्या योग्य व्यवस्थापनासाठी महानगरपालिका पूर्ण ताकदीने कार्यरत राहील.

ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला आयोजित या दोन अनोख्या विश्वविक्रमांमुळे संपूर्ण नाशिक शहर कुंभमेळ्याच्या दिव्य आणि मंगलमय वातावरणात न्हावून निघणार आहे.

 

Comments

No comments yet.