मुंबई, (प्रतिनिधी) १८ ऑक्टोबर - आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून बळजबरीने व बेकायदेशीरपणे मानवी स्त्रीबीज (Eggs) काढून व्यावसायिक विक्री करणाऱ्या रॅकेटविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ED) महाराष्ट्रात धडक कारवाई केली आहे. ईडीने राज्यभरात ११ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले असून, या हाय-प्रोफाइल आणि संतापजनक गुन्ह्यात नाशिक कनेक्शन देखील असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी या प्रकरणात नाशिकच्या एका नामांकित आयव्हीएफ (IVF) सेंटरच्या संचालकाला अटक झाल्याने, आता ईडीच्या या नव्या छाप्यांमुळे नाशिकमधील वैद्यकीय व एजंट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
गेल्या काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांच्या पथकाने बदलापूर आणि मुंबई महानगर क्षेत्रातून मानवी स्त्रीबीजांच्या बेकायदेशीर व्यापारी खरेदी-विक्री व extraction (काढून घेण्याच्या) रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या रॅकेटमार्फत ४० हून अधिक अत्यंत गरीब व आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना लक्ष्य करण्यात आले.
या टोळीतील लोकांनी महिलांना अवघ्या २५ ते ३० हजार रुपयांचे प्रलोभन दाखवून त्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळला. धक्कादायक बाब म्हणजे, कायद्याचे उल्लंघन करून आणि कोणतीही वैद्यकीय सुरक्षितता न पाळता एकाच महिलेच्या शरीरातून तब्बल ३३ वेळा स्त्रीबीज काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नाशिक कनेक्शन आणि मागील कारवाई
या संपूर्ण रॅकेटचा तपास जसजसा पुढे सरकला, तसतसे त्याचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले. या अवैध धंद्यात सहभाग असल्याप्रकरणी आणि बेकायदेशीरपणे स्त्रीबीज काढण्याच्या प्रक्रियेत मदत केल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या 'माल्टी आयव्हीएफ सेंटर'च्या (Malti IVF Center) संचालकाला व वैद्याकीय तज्ज्ञाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. नाशिक महानगरपालिकेनेही या प्रकरणी गंभीर दखल घेत संबंधित केंद्राला नोटीस बजावली होती व कागदपत्रांची छाननी सुरू केली होती.
ईडीची धडक कारवाई आणि मनी लाँड्रिंगचा तपास
या मानवी तस्करी व फसवणुकीच्या रॅकेटमधून संशयितांनी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा कमावल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर, मनी लाँड्रिंगप्रकरणी (PMLA) ईडीने मुंबईसह राज्यभरात ११ ठिकाणी एकाच वेळी छापेसत्र राबवले.
या रॅकेटमधील मुख्य सूत्रधार, एजंट, स्थानिक मध्यस्थ, तसेच यात प्रत्यक्ष सहभाग असलेली काही रुग्णालये व आयव्हीएफ सेंटर्स आता केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आली आहेत.
महिलांना हॉर्मोन्सची ओव्हुलेशन-स्टिम्युलेटिंग इन्जेक्शन्स कोण देत होते आणि त्यानंतर कोणत्या रुग्णालयांमध्ये हे काळे धंदे चालत होते, याचा सखोल शोध ईडी घेत आहे.
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरचे नाव यापूर्वी समोर आल्यामुळे आणि आता ईडीच्या फेऱ्यात हे प्रकरण आल्याने, नाशिकमधील इतरही काही संशयित वैद्यकीय व्यावसायिक व एजंट्स तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गरीब महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमागील बड्या माशांचे चेहरे लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.