अल्पवयीन मुलीसह महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न... नाशिक शहरातील प्रकार...

Share:
Main Image
Last updated: 18-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १८ ऑक्टोबर - शहरात महिला व अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. शुक्रवारी (दि. १६) घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कारमध्ये बसलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत एका महिलेस मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटना पहिली: कारमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग (मुंबईनाका पोलीस ठाणे)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश सुरेश चिल्लारे (वय २३, रा. शिवाजीवाडी, भारतनगर) असे संशयिताचे नाव आहे. पीडित मुलीचे आई-वडील शुक्रवारी रात्री आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी शिवाजीवाडी भागात गेले होते. त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि ते घरात गेले. यादरम्यान कारमध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलीचा संशयित आकाश याने बळझबरीने कारचा दरवाजा उघडून विनयभंग केला. मुलीने त्वरित आरडाओरड केल्याने हा प्रकार समोर आला.

Advertisement

या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

घटना दुसरी: खडकाळी भागात महिलेस मारहाण व विनयभंग (भद्रकाली पोलीस ठाणे)

दुसरी घटना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकाळी परिसरातील त्र्यंबक पोलीस चौकी भागात घडली. पीडित महिला गुरुवारी (दि. १५) रात्री आपल्या भावाला सोबत घेऊन मुलांकडे चालली होती. यादरम्यान किरकोळ वादातून 'बशीर' नावाच्या इसमाने "हा आमचा मोहल्ला आहे, तुम्ही येथून निघून जा," असे म्हणत पीडितेच्या गालात चापट मारून विनयभंग केला.

या घटनेदरम्यान अन्य तीन ते चार जणांनीही शिवीगाळ करत पीडितेची ओढातान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

Comments

No comments yet.