त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) १८ ऑक्टोबर - सिंहस्थ कुंभमेळ्याचा आगामी ध्वजारोहण समारंभ जवळ आला असला, तरी या कालावधीत ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे सुरूच राहणार आहे. मंदिराच्या अंतर्गत सुरू असलेली कामे आणि कुंभमेळ्याच्या तयारीचे नियोजन पाहता, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि देवस्थानचे उत्पन्न व स्थानिक व्यापार सुरक्षित राखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत देवस्थानकडून कोणतीही अधिकृत मंदिर बंद ठेवण्याची प्रेस नोट जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिर सुरूच राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण; मंदिरास आकर्षक सजावट
आगामी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे. या विशेष प्रसंगी मंदिराला फुलांची आकर्षक आणि सुंदर सजावट केली जाणार असून, मंदिर अधिक संथपणे आणि दिव्य वातावरणात उजळून निघणार आहे.
दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमा आणि रथोत्सव
सध्या दिवाळीचा सण जवळ आला असून, २४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरी पौर्णिमा) आहे. या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे तीन दिवस चालणारा प्रसिद्ध आणि भव्य रथोत्सव साजरा केला जातो. याशिवाय दिवाळी काळात मंदिरात पाडावा पूजन व लक्ष्मीपूजन होत असते. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देश-विदेशातून आणि राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. जर मंदिर बंद ठेवले असते, तर भाविकांची मोठी गैरसोय झाली असती आणि स्थानिकांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम झाला असता.
नियोजन करून मिळणार दर्शन
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाह्य भागातील कोटाला चार दरवाजे असून आतील मुख्य भागाला तीन दरवाजे आहेत. त्यामुळे मर्यादित संख्येने का होईना, पण भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन देणे शक्य आहे, असे जागरूक नागरिकांचे मत आहे. भाविकांची होणारी गर्दी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्यात आले असून, मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुलेच राहणार आहेत.
दुसरीकडे, पितृपक्षापासून कुशावर्त तीर्थ बंद ठेवण्यात आल्यामुळे भाविकांमध्ये काहीशी नाराजी दिसून आली होती. आता ३१ ऑक्टोबर रोजी कुशावर्त तीर्थ खुले होणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकूणच, कुंभमेळा आणि सणासुदीच्या काळात मंदिर सुरू ठेवण्याच्या या निर्णयाचे भाविक, पुरोहित वर्ग आणि नागरिकांकडून स्वागत होत आहे.