नाशिक, (प्रतिनिधी) १७ ऑक्टोबर - लाखलगाव शिवारात रस्ता ओलांडून पायी घरी जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ७६ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भास्कर यशवंत कांडेकर (रा. कांडेकर वस्ती, छत्रपती संभाजीनगर रोड, लाखलगाव, ता. व जि. नाशिक) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
नेमकी काय आहे घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर कांडेकर हे गेल्या गुरुवारी लाखलगाव येथे गेले होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते लाखलगावकडून मळ्याच्या दिशेने आपल्या घरी पायी जात होते. यादरम्यान, मागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कांडेकर गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांचे सुपुत्र सुनील कांडेकर यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी येथील सुविख्यात 'सुविधा हॉस्पिटल'मध्ये दाखल केले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. १६) रात्रीच्या सुमारास प्रकृती बिघडल्याने डॉ. विशाल करवंदे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे कांडेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.