भूमी अभिलेखचा शिपाई व सायबर कॅफे चालक जाळ्यात... यासाठी मागितली लाच...

Share:
Main Image
Last updated: 17-Oct-2026

 

भुसावळ, (प्रतिनिधी) १७ ऑक्टोबर - शेतजमिनीच्या मोजणी प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागून ती खासगी इसमामार्फत स्वीकारल्याप्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, भुसावळ येथील एक शिपाई आणि एका सायबर कॅफे चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील नेहते हॉस्पिटलजवळ ही धडक कारवाई करण्यात आली.

ताब्यात घेतलेले संशयित:

१. सचिन किसन पाटील (वय ४५, व्यवसाय: नोकरी-शिपाई, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, भुसावळ; रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव)

२. राकेश रामदास चव्हाण (वय ४३, व्यवसाय: सायबर कॅफे चालक; रा. तापी नगर, भुसावळ, जि. जळगाव)

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार शेतकऱ्याची मौजे गोजोरे (ता. भुसावळ) शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी त्यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथील 'चव्हाण सायबर कॅफे'मधून ऑनलाइन अर्ज करून मोजणीचे २ हजार रुपयांचे शासकीय चलन भरले होते.

मात्र, ३० सप्टेंबर रोजी तक्रारदारांच्या मोबाईलवर मोजणी प्रकरणाबाबत त्रुटी असल्याचा संदेश (मेसेज) आला. त्याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, "माझे भूमी अभिलेखमधील सचिन पाटील यांच्याशी बोलणे झाले असून तुमचे काम होऊन जाईल," असे सांगत चव्हाण यांनी दिलासा दिला होता.

Advertisement

१ हजारांची लाच मागितली

१६ ऑक्टोबर २०२६ रोजी राकेश चव्हाण याने तक्रारदाराला फोन करून, शेतजमिनीच्या मोजणीतील त्रुटी दूर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन पाटील यांनी १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे सांगितले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव कार्यालयात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली.

एसीबीच्या पथकाने १६ ऑक्टोबर रोजी पंचसाक्ष्ये लाच मागणीची पडताळणी केली असता, शिपाई सचिन पाटील यांनी मोजणीच्या त्रुटी दूर करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

सापळा रचून रंगेहात पकडले

पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास भुसावळात सापळा रचला. सचिन पाटील यांच्या सांगण्यावरून राकेश चव्हाण याने तक्रारदारास लाच देण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर जामनेर रस्त्याकडून हनुमान नगराकडे जाणाऱ्या मार्गावरील नेहते हॉस्पिटलजवळ राकेश चव्हाण याने शिपाई सचिन पाटील यांच्याकरिता तक्रारदाराकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने त्याला रंगेहात पकडले.

याप्रकरणी दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मार्गदर्शक व कारवाई करणारे पथक:

सदर यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, तसेच पोलीस अंमलदार किशोर महाजन, मनोज पाटील आणि प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने पार पाडली.

 

Comments

No comments yet.