व्हॉट्सॲपवर कॉल केला... थेट २५ लाख लंपास केले...

Share:
Main Image
Last updated: 17-Oct-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ ऑक्टोबर - मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याची बतावणी करून आणि संपूर्ण कुटुंबाला अटक करण्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी एका नागरिकाची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

नेमका कसा घडला प्रकार?

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी (ता. ५) सायबर भामट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला. 'विजय कुमार' नावाच्या इसमाने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधत, तक्रारदाराच्या बँक खात्याचा मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात समावेश असल्याची बनावट माहिती दिली.

या प्रकारामुळे पूर्णपणे भेदरलेल्या तक्रारदाराशी भामट्यांनी 'सिग्नल' आणि 'व्हॉट्सॲप' ॲपद्वारे व्हिडिओ कॉलवर संपर्क साधला. यादरम्यान पोलीस वर्दी घातलेली आणि 'ओंकारसिंग राजपूत' तसेच 'एम. चौधरी' अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याशी चर्चा केली.

Advertisement

अटक करण्याची धमकी आणि २५ लाखांची वसुली

तक्रारदार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गंभीर गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत भामट्यांनी त्यांना मानसिक दबावाखाली आणले. स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या तपासणीचे नाटक करत, खात्यातील सर्व रक्कम फेडरल बँकेच्या एका विशिष्ट खात्यात जमा करण्यास त्यांना भाग पाडले. हा फसवणुकीचा प्रकार ५ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान घडला.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पीडित नागरिकाने तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे पुढील तपास करत आहेत.

पोलीस, सीबीआय, ईडी किंवा इतर कोणतीही तपास यंत्रणा कधीही फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून 'डिजिटल अरेस्ट' करत नाही किंवा बँक खात्यात पैसे ट्रांसफर करण्यास सांगत नाही. अशा प्रकारचा कोणताही फोन आल्यास घाबरून न जाता तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments

No comments yet.