नाशिक, (प्रतिनिधी) १७ ऑक्टोबर - रास्तभाव दुकानांच्या वेळेची मर्यादा ओलांडून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार अन्नधान्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राज्यातील पहिले अत्याधुनिक ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ नाशिकमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (World Food Programme) सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लाभार्थीकेंद्रित होण्यास मोठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील डिस्टिलरी क्वार्टर, गोरेवाडी रोड येथे मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते शनिवारी (दि. १७) या धान्य एटीएमचे औपचारिक उद्घाटन पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त प्रशांत काळे, जिल्हा धान्य वितरण अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धान्य वितरण अधिक सुलभ
उद्घाटनप्रसंगी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य सन्मानाने आणि वेळेत मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. आज विविध क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना अन्नधान्य वितरण व्यवस्थेतही त्याचा प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ हा त्याच दिशेने टाकलेला एक क्रांतीकारक टप्पा आहे."
सध्या राज्यात सुमारे ५४ हजार रास्तभाव दुकानांमार्फत तब्बल ७ ते ७.५ कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरीत केले जाते. मात्र, दुकानांच्या ठरावीक वेळेमुळे कामगार व इतर नागरिकांना धान्य घेण्यास अडचणी येत होत्या. आता धान्य एटीएममुळे लाभार्थ्यांना २४ तास धान्य उपलब्ध होणार आहे.
पारदर्शक आणि कार्यक्षम व्यवस्थेकडे वाटचाल
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ई-पॉस (e-PoS) यंत्रणा, आधार प्रमाणीकरण आणि डिजिटल नोंदींमुळे पारदर्शकता वाढली आहे. धान्याची वाहतूक आणि वितरणातील अनावश्यक टप्पे कमी केल्याने वेळेची बचत होऊन व्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास मंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.
नाशिकनंतर नागपूर आणि ठाण्यातही सुविधा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद: "नाशिकमध्ये हे पहिले धान्य एटीएम सुरू झाल्याने नागरिकांना २४ तास धान्य मिळणे शक्य झाले असून, पात्र लाभार्थ्यांनी या अत्याधुनिक सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा."
उपायुक्त प्रशांत काळे: "महाराष्ट्रात प्रस्तावित तीन धान्य एटीएमपैकी पहिले एटीएम नाशिक येथे सुरू झाले असून, यानंतर नागपूर आणि ठाणे येथेही लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येईल. याचा मोठा फायदा विशेषतः स्थलांतरित कामगारांना होणार आहे."
या कार्यक्रमादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रत्यक्ष धान्य एटीएमच्या साहाय्याने प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यात आले.